४० टक्के कमिशनचं सरकार! ती घोषणा काँग्रेसवरच होतेय बुमरँग, राजस्थानमध्ये ठरतेय डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 12:29 PM2023-07-06T12:29:23+5:302023-07-06T12:33:24+5:30
Congress: कर्नाटकमध्ये भाजपा सरकारला ४० टक्के कमिशनवालं सरकार या घोषणेद्वारे पराभूत करणाऱ्या काँग्रेसला तीच घोषणा आता त्रासदायक ठरत आहे.
कर्नाटकमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तेथील प्रत्येक योजना राजस्थानमध्ये लागू करण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. मात्र कर्नाटक काँग्रेसने दिलेली एक घोषणा राजस्थानमध्ये काँग्रेसवरच बुमरँग होताना दिसत आहे. कर्नाटकमध्ये भाजपा सरकारला ४० टक्के कमिशनवालं सरकार या घोषणेद्वारे पराभूत करणाऱ्या काँग्रेसची राजस्थानमध्ये सरकार आणि मंत्र्यांवर दररोज होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे काँग्रेस पक्ष अडचणीत येत आहे. आता भ्रष्टाचाराच्या नव्या प्रकरणातमध्ये शिक्षणमंत्री जाहिदा खान यांच्यावर आरोप झाले आहेत.
राज्यसभा खासदार मीणा यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे पुत्र वैभव गहलोत यांच्यांवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून टीका केली होती. आता प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयासमोर शिक्षण राज्यमंत्री जाहिदा खान यांनी भ्रष्टाचार केल्याचे पोस्टर्स लागल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली.
गहलोत सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. आता बदली करण्यासाठी लाखो रुपये घेऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिक्षण राज्यमंत्री जाहिदा खान यांच्यावर केला आहे. हा आरोप करणाऱ्या पोस्टरवर लिहिले आहे की, प्रभारी रंधावा मंत्री जाहिदा खान यांच्याकडून आमचे पैसे परत मिळवून द्या. मंत्री जाहिदा खान यांच्याकडून माझे ३ लाख रुपये परत मिळवून द्या. एवढंच नाही तर एका पोस्टरवर राजस्थान सरकारमधील सर्वात भ्रष्टमंत्री जाहिदा खान आहेत. पोस्टरवरून केलेले आरोप हस्तलिखित आहेत. तसेच निवेदकाच्या जागी दु:खी शिक्षक आहेत. दरम्यान, राजस्थानमध्ये सत्तेवर असलेल्या अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये असलेल्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत.
राजस्थानमध्ये यावर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेससाठी हा मुद्दा अडचणीचा ठरू शकतो.