Kuno National Park: भारत सरकारने चित्तांसाठी तयार केले बॉडीगार्ड, 9 सदस्यीय टीम ठेवणार लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 01:55 PM2022-10-07T13:55:40+5:302022-10-07T13:57:47+5:30
भारतात मागील महिन्यात आफ्रिकेतून 8 चित्ते आणण्यात आले होते.
नवी दिल्ली : भारतात मागील महिन्यात 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आफ्रिकेतील नामिबिया देशातून 8 चित्ते भारतात आणण्यात आले होते. भारताच्या भूमीवर तब्बल 74 वर्षांनंतर चित्ता प्राणी वावरत आहेत. 74 वर्षांपूर्वी चित्ता प्राणी भारतातून नामशेष झाला होता. नामिबियातून आणलेले हे आठ चित्ते मध्य प्रदेशातील श्योपूर येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहेत. सन 1952 मध्ये भारत देशातून चित्ता नामशेष झाल्याचे सरकारकडून घोषित करण्यात आले होते. चित्ता नामशेष झाल्यानंतर भारतीय गवताळ प्रदेशातील याचा परिसंस्थेवरही परिणाम झाला. म्हणूनच पंतप्रधान मोदींनी ग्रासलँड इकोसिस्टम राखण्यासाठी हे चित्ते बाहेरून आणले आहेत.
चित्तांच्या आगमनामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही सरकारची आहे. त्यासाठी चित्त्यांवरही सातत्याने नजर ठेवण्यात येत आहे. चित्त्यांना त्यांच्या वातावरणानुसार अटी देण्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारने त्यांच्यासाठी 9 सदस्यीय टास्क फोर्स तयार केले आहे.
टास्क फोर्समधील 9 सदस्य
- प्रधान सचिव (वन), मध्य प्रदेश - सदस्य
- प्रधान सचिव (पर्यटन), मध्य प्रदेश - सदस्य
- प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि वन दलाचे प्रमुख, मध्य प्रदेश - सदस्य
- प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आणि मुख्य वन्यजीव संरक्षक, मध्य प्रदेश- नवी दिल्ली
- श्री आलोक कुमार, सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आणि मुख्य वन्यजीव वॉर्डन, मध्य प्रदेश - सदस्य
- डॉ. अमित मलिक, महानिरीक्षक, एनटीसीए, नवी दिल्ली - सदस्य
- डॉ. विष्णू प्रिया, शास्त्रज्ञ, भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून - सदस्य
- श्री अभिलाष खांडेकर, सदस्य मध्य प्रदेश NBWL, भोपाळ
- श्री शुभरंजन सेन, APCCF- वन्यजीव - सदस्य निमंत्रक
5 वर्षांची आहे योजना
भारत सरकारने चित्ता देशात आणण्यासाठी एकूण पाच वर्षांची योजना बनवली आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात 8 चित्ते आणण्यात आले आहेत. तर या 5 वर्षांनंतर दुसऱ्या टप्प्यात दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते आणण्यात येणार आहेत. कुनो नॅशनल पार्क व्यतिरिक्त ते समान हवामान आणि वनक्षेत्र असलेल्या इतर कोणत्याही राष्ट्रीय उद्यानात सोडले जातील.
पाच मादी व तीन नर चित्ते
नामिबियातून भारतात आणलेल्या आठ चित्तांमध्ये पाच मादी व तीन नर आहेत. त्यापैकी पाच मादी चित्तांचे वय दोन ते पाच वर्षे दरम्यान तर तीन नर चित्त्यांचे वय 4.5 ते 5.5 वर्षे दरम्यान आहे, अशी माहिती चित्ता कॉन्झर्व्हेशन फंड (CCF) या स्वयंसेवी संस्थेने दिली.