हैदराबाद - टिकटॉक हे नेटीझन्सचे आवडते अॅप बनले आहे. मजेशीर व्हिडीओंचा खनिजा आणि मजेशीर व्हिडीओ तयार करण्यासाठी मिळालेलं व्यासपीठ हे टिकटॉकचं वैशिष्ट आहे. त्यामुळे टिक-टॉक हे अॅप सोशल मीडियावर सुपरहीट ठरले आहे. तर, या अॅपला बॅन करण्यासंदर्भात याचिकाही करण्यात आल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या अॅपला मंजुरी दिल्याचे याचिकाकर्त्यांचा तो प्रयत्न फोल ठरला आहे.
गाणे, मजेशीर व्हिडीओ आणि मेम्स यासाठी टिकटॉक अॅप प्रसिद्ध आहे. तेलंगणाच्या खमाम महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये एक मजेशीर व्हिडीओ रेकॉर्ड करुन टिकटॉकवर अपलोड केला होता. त्यानंतर, सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. केएमसीच्या कर्मचाऱ्यांनी या व्हिडीओत गाणे गायले असून चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगचाही उपयोग केला आहे. विशेष म्हणजे ऑफिस वेळेत चक्क ऑफिसमध्येच हा व्हिडीओ चित्रीत करण्यात आला होता. टिकटॉकवर अपलोड केल्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर केएमसी प्रशासनाने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
केएमसी प्रशासनाकडून व्हिडीओतील कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या पगारीतही कपात करण्यात आली आहे. खमामचे जिल्हाधिकारी आर. व्ही. कर्नान यांनी याबाबत कारवाई केली आहे. या व्हिडीओत 11 कर्मचाऱ्यांचा समावेश असून या सर्वांची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली आहे. केएमसी आयुक्त जे. श्रीनिवासा राव यांनी याबाबत माहिती दिली असून दंड म्हणून या कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात करण्यात आल्याचे राव यांनी सांगितले.
सोशल मीडियावरील या व्हिडीओचे काहींनी समर्थन केले आहे, तर अनेकांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या या कृत्याला बेजाबदार म्हटले आहे. कार्यालयीन कामजापासून तणावमुक्तीसाठी विरंगुळा, असे काहींनी म्हटले आहे. तर, सरकारी नोकरदार कामापेक्षा फालतुपणा अधिक करतात, काम कमीच असते, असे म्हणत अनेकांनी लक्ष्यही केले आहे.