नवी दिल्ली : मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप रद्द करण्याच्या निर्णयावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शनिवारी केंद्रावर घणाघात केला. एखादा बिल्ला मिरवावा त्याप्रमाणे केंद्र सरकार अल्पसंख्याकविरोधी धोरणे खुलेआमपणे दाखवत आहे, असे ते म्हणाले.
‘उच्च शिक्षणासाठी मौलाना आझाद नॅशनल फेलोशिपसारख्या विविध योजना आधीच सुरू आहेत. त्यामुळे सरकारने २०२२-२३ पासून एमएएनएफ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे अल्पसंख्याक व्यवहारमंत्री स्मृती इराणी यांनी नुकतेच लोकसभेतील एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल सांगितले होते. त्यावर ट्वीटच्या माध्यमातून चिदंबरम यांनी जोरदार टीका केली.
‘अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप व परदेशात शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जावरील अनुदान रद्द करण्याचे सरकारने दिलेले कारण तर्कहीन व मनमानी आहे,’ असे ते म्हणाले. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे जीवन खडतर करण्यासाठी सरकार वेगाने काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.