नवी दिल्ली, दि. 23 - जीडीपीमधील वाढीसंदर्भात केंद्र सरकारनं केलेल्या दाव्यांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी कोपरखळी घेत एक विचित्र विधान केले आहे. सरकारचा वाढीचा अर्थ म्हणजे गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ असा होता. यानंतर सिब्बल यांनी म्हटले की, मात्र सरकारला आता जाणवले आहे की अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी व्हायग्राची आवश्यकता आहे.
कपिल सिब्बल यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हटले की, ''ते म्हणायची की देशाच्या जीडीपीमध्ये वाढ होईल. या वाढीचा खरा अर्थ म्हणजे सिलिंडर गॅस, डिझेल, पेट्रोलच्या किंमतींमध्ये वाढ होणे असा आहे. एक लिटर कच्च्या तेलाची किंमत जवळपास 21 रुपये आहे आणि रिफाइन केल्यानंतर त्याची किंमत जवळपास 31 रुपये एवढी होते. सरकारला प्रत्येक लिटर मागे 48 रुपयांचा नफा होत आहे''.
सिब्बल पुढे असेही म्हणाले की, सामान्य नागरिक व शेतक-याला महागाईचे हे ओझे उचलावं लागत आहे. नफा सरकारला मिळतो आणि महागाईचं ओझं सामान्य नागरिक व शेतक-याच्या डोक्यावर येते. सर्वसामान्य नागरिकाच्या डोक्यावरील हे ओझं कमी करण्याऐवजी ते वाढत जात आहे. यावर भाजपाचे मंत्री म्हणतात की, पेट्रोल, डिझेल खरेदी करणारे काही गरीब लोकं नाहीत किंवा ते भुकेने मरतही नाहीत'. असे सांगत सिब्बल यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री के. जे. अल्फोन्स यांच्यावर टीका केली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अल्फोन्स यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. ''पेट्रोल, डिझेल खरेदी करणारे काही गरीब लोकं नाहीत किंवा ते भुकेने मरतही नाही आहेत. पेट्रोलची खरेदी करणारे कार आणि बाईकचे मालक आहेत. त्यांना पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त कर भरावाच लागेल. केंद्र सरकारला गरिबांचं भलं करायचं आहे त्यामुळे श्रीमंतावर जास्त टॅक्स लावत आहे'', असं अल्फोन्स म्हणाले होते.
यावर सिब्बल म्हणालेत, ''गरीब आणखी गरीब होत जात आहे आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत जात आहे. आता या सरकारला जाणवलं आहे की अर्थव्यवस्थासंदर्भात काही करण्यासाठी त्यांना व्हायग्रासारख्या गोष्टीची गरज आहे. साडेतीन वर्षांनंतर जर अर्थव्यवस्थेची अशी स्थिती राहिली तर, देशाचं काय होईल?. अर्थव्यवस्था वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना व्हायग्राची आवश्यकता आहे, याची त्यांना जाणीव झाली, हे बरं झालं'', अशी खरमरीत पण तितकीच विचित्र शब्दांत सिब्बल यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे.