नवी दिल्ली - गांधी परिवाराच्या सुरक्षेचा मुद्दा देशभरात तसेच संसदेत गाजत असताना प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुक पोस्ट करत सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की, प्रियंका, माझी मुले, गांधी परिवार असो वा मी स्वत: यांच्या सुरक्षेचा प्रश्न नाही. हा मुद्दा आहे की, आपल्या देशातील नागरिक, विशेषत: महिलांना सुरक्षित ठेवणं अथवा त्यांना सुरक्षित वाटावं असं आहे. संपूर्ण देशात सुरक्षेच्या बाबतीत तडजोड केली जात आहे. मुलींसोबत छेडछाड, बलात्कार होत आहेत. आपण कोणता समाज बनवतो आहोत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. जर आम्ही आमच्या देशात, आमच्या घरात, रस्त्यावर सुरक्षित नाही, दिवसा सुरक्षित नाही अथवा रात्री सुरक्षित नाही तर आम्ही कुठे आणि केव्हा सुरक्षित आहोत? अशी भावना रॉबर्ट वाड्रा यांनी व्यक्त केली आहे.
एका आठवडाभरापूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता अज्ञात व्यक्तींनी सेल्फी घेण्यासाठी प्रियंका गांधी यांच्या घरात प्रवेश केला. २६ नोव्हेंबरला २ वाजता त्यांच्या घराच्या आवारात एक अज्ञात गाडीने शिरकाव केला. त्यातून काही जण उतरले होते. माहितीनुसार प्रियंका गांधी यांच्या घराच्या आवारात ३ महिला, १ पुरुष आणि १ लहान मुलाने प्रवेश केला होता.
घरात आलेल्या त्या लोकांनी सांगितले की, आम्ही प्रियंका गांधी यांचे चाहते आहोत. त्यांची भेट घेण्यासाठी आलोत. मात्र सीआरपीएफने याप्रकरणी तक्रार नोंद केली आहे. या घटनेची चौकशी करण्याचं काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. सध्या त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफ पोलिसांवर आहे.
गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा हटविल्यावरुन काँग्रेसने सत्ताधारी भाजपावर सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. यावर पलटवार करताना अमित शाह यांनी सुडाचे राजकारण करणे हे भाजपाच्या संस्कारांध्ये नाही, तर ती काँग्रेसची ओळख असल्याचे सांगत हल्लाबोल केला होता. आतापर्यंत एसपीजी सुरक्षेच्या नियमांमध्ये जे बदल झाले होते. ते फक्त एका कुटुंबाला लक्षात घेऊन करण्यात आले होते. मात्र, आता यामध्ये पहिल्यांदा पंतप्रधानांची सुरक्षा पाहून बदल करण्यात येत आहे. एसपीजी पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी आहे. याचा प्रतिष्ठेचं प्रतिक (status symbol) म्हणून वापर होणार नाही, असे सांगत अमित शाह यांनी गांधी कुटुंबीयांचे नाव न घेता टोला लगावला. याचबरोबर, आता फक्त जे पंतप्रधान असतील त्यांनाच ही सुरक्षा मिळेल. शिवाय माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाला फक्त ५ वर्ष ही सुरक्षा दिली जाईल, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे.