उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात एका सरकारी शाळेतील शिक्षक दारूच्या नशेत शाळेत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढंच नाही तर नशेत तो वर्गात गेला आणि खुर्चीत बसून झोपी गेला. शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी खुर्चीत झोपलेल्या शिक्षकाला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तो इतका नशेत होता की तो उठलाच नाही.
शिक्षकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर BSA ने कारवाई केली आहे. आरोपी शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. हा व्हिडीओ परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. हमीरपूर जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो शाळेत खुर्चीवर बसून दारूच्या नशेत असल्याचं दिसत आहे. शाळेत पोहोचलेल्या काही पालकांनी शिक्षकाला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो उठला नाही. यावर काही लोकांनी त्याचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला.
व्हायरल व्हिडीओच्या तपासात तो मुस्करा ब्लॉक परिसरातील गलिहामऊ गावातील असल्याचं समोर आलं आहे. प्राथमिक शाळेत तैनात शिक्षक आदल्या दिवशी दारूच्या नशेत खुर्चीत डोलत होते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. याची माहिती मिळताच काही पालकांनी शाळेत पोहोचून शिक्षकाला उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने एवढी दारू प्यायली होती की त्याला खुर्चीवरून उठता येत नव्हते.
दरम्यान, गावकऱ्यांनी मद्यधुंद शिक्षकाचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. यापूर्वीही हा शिक्षक अनेकदा दारूच्या नशेत शाळेत आला होता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र समजावून सांगूनही तो ऐकला नाही. त्यामुळे व्हिडीओ बनवून शिक्षकाच्या गैरकृत्यांचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी जिल्हा मूलभूत शिक्षणाधिकारी आलोक सिंह यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून त्यात शिक्षक दोषी आढळला आहे. त्यामुळे त्याला निलंबित करण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.