अयोध्या - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज सहकुटुंब शिवसेनेच्या 18 खासदारांसह अयोध्येत जाऊन रामजन्मभूमीचं दर्शन घेतलं. लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर शिवसेनेने पुन्हा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करत अयोध्येचा दौरा केला आहे. पहिले मंदिर फिर सरकार या घोषणेनंतर राम मंदिराचा मुद्दा पुन्हा तापला आहे. राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच अशी आग्रही मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अयोध्येत घेतली आहे.
रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अयोध्येतील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, ही जागा अशी आहे, जिथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा, कायदा करून मंदिर बनवावे. हिंदूंची एकता कायम राहिली पाहीजे. पहिले मंदिर आणि मग संसद हे आम्ही आचरणातून दाखवून दिले आहे, उद्या संसदेचे कामकाज सुरू होत आहे, त्यापूर्वी शिवसेनेचे खासदार प्रभू रामाच्या दर्शनासाठी आले आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच राम मंदिर व्हावं ही लोकांची इच्छा आहे. नरेंद्र मोदी सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे. राम मंदिर व्हावे ही बाळासाहेबांना वाटत होतं. हिंदू लोकांनी एकत्र राहावं यासाठी शिवसेनेने कधीही महाराष्ट्राच्या बाहेर निवडणुका लढविल्या नाहीत असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी अयोध्येत जागोजागी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे होर्डिग्ज आणि फलक लावण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर महिन्यात अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी राम मंदिरासाठी सरकारने अध्यादेश काढावा, त्यास शिवसेनेचा पाठिंबा असेल, असे म्हटले होते. तसेच राम मंदिर बांधण्याची तारीख आम्हाला हवी आहे, आम्हाला राम मंदिराच्या उभारणीची तारीख कळवा, नंतरच इतर विषयांवर बोलू, असे म्हणत उद्धव यांनी युतीचा मुद्दाही लांबणीवर ढकलला होता. मात्र, निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत युती केली. लोकसभा निवडणुकांमध्ये युतीला मोठं यशही मिळालं आहे. त्यामध्ये शिवसेनेला 18 जागांवर विजय मिळाला आहे.