Swami Avimukteshwaranand Saraswati : महाराष्ट्र सरकारने नुकताच देशी गायींना राज्यमाता-गोमाता म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारनं महाराष्ट्रातील देशी गायींना राज्यमाता-गोमाता घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली. त्यानंतर हा प्रस्ताव मान्य करून जीआर जारी करण्यात आला. अशातच आता बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केंद्र सरकारकडे गायींसंदर्भात एक मागणी केली आहे. गायीला जनावरांच्या श्रेणीतून वगळण्याची मागणी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केंद्राकडे केली आहे. गायीला जनावर म्हणणं चुकीचं असल्याचेही स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे गौ प्रतिष्ठा ध्वज स्थापन करण्यासाठी भारत भेटीदरम्यान ओडिशामध्ये पोहोचले होते. यावेळी बोलताना त्यांनी गायीला जनावरांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली. सरकारी यादीत गाय हा प्राणी आहे, पण सनातन धर्मात गायीला आईचा दर्जा आहे. त्यामुळे गायीला जनावरांच्या श्रेणीतून वगळ्यात यावं असं अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलं. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे दीर्घकाळापासून गायींच्या संवर्धनासाठी काम करत आहेत.
"सरकारी यादीत गायीला प्राण्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. तर भारतीय सभ्यता आणि संस्कृतीत गायीला देवी म्हटले गेले आहे. गायीला माता म्हणत तिचे महत्त्व सांगितले आहे. सनातन धर्म मानणारे लोक गायीला गौ माता म्हणतात. त्यामुळे गायीला प्राणी म्हणणे हा सनातन धर्माचा आणि सनातन धर्माच्या अनुयायांचा अपमान आहे. आपली परंपरा आपणच पुढे नेली पाहिजे. यासाठी सरकारने जारी केलेल्या जनावरांच्या यादीतून गाय वगळावी लागणार आहे," असं अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.
"गोमातेचं सरंक्षण आणि संवर्धनासाठी सरकारने कायदा केल्यानंतर लोकांनाही याचं व सनातन धर्माचं गांभीर्य समजेल. त्यामुळे लोकांचा विचार करण्याची पद्धत, गायीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. राहीला मुद्दा गायींची सेवा करण्याचा, त्यांची चांगली काळजी घेण्याचा हे आमचे काम आहे. बाकी सरकारने आधी आपले काम करावे. सरकारने गायीला जनावरांच्या यादीत ठेवले आहे. त्यामुळे लोकही गाईला जनावरासारखे वागवतात," असेही अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलं.