नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची विश्वसनीय माहिती सरकारने उपलब्ध केली पाहिजे, अशी मागणी करून कोरोनामुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख रूपये नुकसानभरपाई दिली पाहिजे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी म्हटले. गुजरातमध्ये कोविडमुळे आपले जीवलग गमावलेल्या कुटुंबांनी सरकारकडून आम्हाला वेळेवर मदत मिळाली नाही, असा आरोप केलेला व्हिडीओ राहुल गांधी यांनी शेअर केला.
भाजपने देशात उत्तम अशा शब्दांत जनतेसमोर आणलेल्या गुजरात मॉडेलवर गांधी यांनी हल्ला केला. ते म्हणाले, “कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची विश्वसनीय माहिती जाहीर करावी आणि कोविड-१९मुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रूपयांची नुकसानभरपाई या काँग्रेसच्या दोन मागण्या आहेत.” लोकांना सरकारकडून नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या वेदना काहीशा कमी होतील, असे गांधी यांनी ‘४ लाख देना होगा’ या हॅशटॅगचा वापर करून हिंदी भाषेत केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले.
काँग्रेसच्या ‘काँग्रेस न्याय कँपेन’चा भाग असलेला या ४.३१ मिनिटांच्या व्हिडिओत गांधी म्हणाले की, “गुजरात मॉडेलची चर्चा तर खूप केली गेली. परंतु, त्यातील कुटुंबांना कोविडकाळात ना रुग्णालय मिळाले ना व्हेंटिलेटर.”