नवी दिल्ली : व्यापमं घोटाळा, ललित मोदी प्रकरणासह विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांनी कंबर कसली असतानाच विरोधकांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही सज्ज झाले आहेत. विरोधकांचा एकजुटीने मुकाबला करण्याची रणनीती आखण्याच्या दृष्टीने उद्या सोमवारी मोदींनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (रालोआ) घटक पक्षांची बैठक बोलावली आहे. मोदी सरकार स्थापन झाल्यापासून अशी बैठक प्रथमच होत आहे.येत्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याचे काँग्रेससह विरोधकांचे मनसुबे आहेत. यासाठी सुषमा स्वराज व स्मृती इराणी यांना हटविण्याच्या मागणीशिवाय शिवराजसिंह चौहान, वसुंधरा राजे आणि रमण सिंह या भाजपाशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्याचे संकेत विरोधकांनी दिले आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या आयपीएल घोटाळ्यातील आरोपी ललित मोदी यांना केलेल्या मदतीवरून वांध्यात सापडल्या आहेत, तर मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी या शैक्षणिक पात्रतेच्या मुद्द्यावर विरोधकांच्या टीकेच्या धनी ठरल्या आहेत. विरोधकांच्या या डावपेचांना मात देणारी रणनीती आखण्यासाठी सरकारनेही याच प्रयत्नांतर्गत नवी रणनीती आखण्याच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी रालोआच्या सर्व घटक पक्षांची बैठक बोलवली आहे.
पावसाळी अधिवेशनात सरकारची कोंडी
By admin | Published: July 20, 2015 1:52 AM