नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. पण आता सामान्यांसाठी एक खूशखबर असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. खाद्यतेल स्वस्त होणार आहे. मोदी सरकारने याबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने पाम तेलासह (Palm Oil) विविध खाद्यतेलावरील आयात शुल्कात प्रति टन 8000 रुपयांची (112 डॉलर्स) कपात केल्याने सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये खाद्यतेलाचे (Edible Oils) भाव प्रचंड वाढले होते. त्यानंतर आता कमी होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने शुल्क कपातीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार क्रूड पाम तेलाचे आयात शुल्क प्रति टनामागे 86 डॉलर्सनी कमी करण्यात आले आहे. क्रूड सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कात देखील सरकारने प्रति टन 37 डॉलरची कपात केली आहे. तर पाम तेलावरील आयात शुल्क प्रति टनामागे 112 डॉलर्सनी घटवण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात भारतीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांची चिंता वाढली होती. यानंतर केंद्र सरकारने तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करुन खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणले जातील, असे आश्वासन दिले होते.
एएमआरजी अँड असोसिएट्सचे वरिष्ठ पार्टनर रजत मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील खाद्यतेलाचा घरगुती वापर आणि मागणी यांच्यात मोठी तफावत आहे, कारण ते मोठ्या प्रमाणात आयात केले जातात. त्यांच्या किरकोळ किंमती गेल्या काही महिन्यांत वाढल्या आहेत. गेल्या एका वर्षभरात खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. तर आता खाद्यतेलाच्या किंमती गेल्या एक महिन्यापासून कमी होत आहेत. काही तेलाच्या किंमतींमध्ये 20 टक्क्यांनी घट झाली आहे. याशिवाय शेंगदाणा तेलाच्या किंमती 8 टक्क्यांनी खाली आल्या आहेत. आता ते 190 च्या ऐवजी 174 रुपये प्रतिकिलो मिळत आहे.
मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार 7 मे 2021 रोजी पाम तेलाची किंमत प्रति किलो 142 रुपये होती. सध्या ते 115 रुपये किलो मिळत आहे. त्याचे दर 19 टक्क्यांनी खाली आले आहेत. दुसरीकडे, सूर्यफूल तेलाच्या किमतीत 16 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या महिन्याच्या 5 तारखेला एक किलो सूर्यफूल तेलाला प्रति किलो 188 रुपये मिळत होता, जे सध्या 157 रुपयांना उपलब्ध आहेत. खाद्यतेलांच्या किंमती गेल्या एका वर्षात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.