दिग्दर्शक सुभाष घई यांची टीका : फसव्या मार्केटिंगमुळे संस्कृतीचे नुकसान
पणजी : सरकारला सिनेमा म्हणजे काय याची जाणीव नाही. कतरिना कैफ व शाहरूख खान यांचा सिनेमा म्हणजेच खरा सिनेमा असा सरकारचाही समज झाला आहे. त्यामुळे सिनेमाचा दर्जा तर घसरत तर आहेच; पण त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचेही नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी देशातील सिनेमाबाबत पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट मत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी व्यक्त केले.
‘उद्याचा सिनेमा’ या विषयावर झालेल्या ‘मास्टर क्लास’मध्ये त्यांनी मार्गदर्शन केले. घई म्हणाले की, सिनेमा हा समाजाचे प्रतिबिंब मांडतो. भारतीय सिनेमा सत्यजीत राय यांच्या नावाने ओळखला जातो; कारण त्यांच्या सिनेमांत भारताचे प्रतिबिंब उमटले. नवीन कलाकारांना सिनेसृष्टीत संधी मिळत नाही; कारण सिनेतारकांच्या मुलांनीच सिनेसृष्टीवर अधिराज्य प्रस्थापित केले आहे.
दिग्दर्शक भवन लाल यांनी सिनेमाविषयी आपल्या भावना सांगितल्या. ते म्हणाले, सगळ्यात जास्त मान कलाकाराला मिळतो; कारण कलाकार हा सगळ्यात सुशिक्षित माणूस असतो. भारतात सिनेमा हा धर्म आहे. सिनेमा हे समाजाचे प्रतिबिंब असले तरी सिनेमा म्हणजे तंत्रज्ञान व व्यवसायही आहे. सिनेमा म्हणजे कल्पना आणि नवनिर्मिती आहे. ‘सोने की चिडीया’वाला देश ‘रोटी कपडा और मकान’ सिनेमांवर येऊन समाप्त झाला; कारण हीच आता गरज बनली आहे, असे घई म्हणाले. सिनेमा हा देशाचा सर्वात मोठा राजदूत आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारतात सांस्कृ तिक मंत्र्यांना काडीचीही किंमत नाही. भारताची संस्कृती हाच उद्याचा सिनेमा आहे. असे सिनेमा आले नाही तर ‘हॅपी न्यू ईयर’सारखेच सिनेमा चालत राहणार. मार्केटिंग ही एक फसवणूक आहे आणि आपला सिनेमा मार्के टिंगमुळे निम्न पातळीवर घसरला आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)