३९ भारतीयांचे प्रकरण सरकार दडपतेय - राहुल गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 02:16 AM2018-03-23T02:16:28+5:302018-03-23T02:16:28+5:30
इराकमधील ३९ भारतीयांच्या मृत्यू प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने डेटा चोरीचे प्रकरण समोर आणले आहे, अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
नवी दिल्ली : इराकमधील ३९ भारतीयांच्या मृत्यू प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने डेटा चोरीचे प्रकरण समोर आणले आहे, अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. या ३९ भारतीयांच्या मृत्यूच्या प्रकरणाच्या बातम्या दडपण्यासाठीच भाजपा व केंद्र सरकारने डेटाचोरीच्या बातम्यांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे ते म्हणाले.
पीएनबी बँकेतील घोटाळा, एससी, एसटी अॅट्रॉसिटी अॅक्टमधील तरतूदी सौम्य करणे आणि इराकमध्ये मारल्या गेलेल्या कुटुंबांकडून उपस्थित करण्यात येत असलेले प्रश्न यावरुन सध्या काँग्रेसने सरकारला लक्ष्य केले आहे.
काँग्रेसचे प्रवक्तेरणदीप सुरजेवाला म्हणाले की, हे ३९ भारतीय लोक मारले गेले आहेत, याचे पुरावे सरकारकडे असूनही सरकार ते जिवंतच आहेत, असे त्यांच्या नातेवाईकांना सांगत होते. मोसूलमध्ये अपहरण झालेल्या ३९ भारतीयांबाबत मोदी सरकार देशाची दिशाभूल का करत होते? असा सवालही त्यांनी केला आहे.
सरकारने लावला नवा शोध
राहुल गांधी यांनी व्टिट केले की, ‘३९ भारतीयांचा मृत्यू झाला. सरकार खोटे बोलत आहे. डेटाचोरीचे प्रकरण काढून काँग्रेसबाबत नवाच शोध लावला आहे. ३९ भारतीय रडारवरून गायब. समस्या समाप्त’.
त्यांच्या मृत्यूची तारीख सांगा
मोदी सरकार आणि सुषमा स्वराज यांनी ४ वर्षे दिशाभूल का केली? असे या मृत व्यक्तींची कुटुंबे विचारत आहेत. सरकारने या लोकांच्या मृत्यूची तारीख का नाही सांगितली? नुकसानभरपाईबाबत सरकार का सहमत नाही? या ३९ भारतीयांचा मृत्यू काही वर्षापूर्वीच झाला होता. तरीही मोदी सरकारने या व्यक्तींच्या कुटुंबांना फसविले, खोटे बोलले अशी टीकाही सुरजेवाला यांनी केली आहे.