सुरेश भटेवरानवी दिल्ली : ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत पुणे येथील ‘सी- डॅक’ च्या अधिपत्याखाली ‘नॅशनल सुपर कम्प्युटर्स मिशन’व्दारे भारतात ३ टप्प्यात ५0 महासंगणक तयार करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. यासाठी ४,५00 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मार्च २0१६ मधेच मंजूरी दिली होती. प्रकल्पाचा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.तीन टप्प्यात संचलित होणाºया या प्रकल्पात सुरूवातीच्या २ टप्प्यात उच्च गतीचे इंटरनेट स्वीचेस व कम्प्युटर नोडस् यासारख्या उपयंत्रांचे डिझाईन व निर्मिती करण्यावर मिशनचा भर आहे तर तिसºया टप्प्यात पूर्ण स्वदेशी सुपर कम्प्युटर्स भारतात तयार करण्याचा मिशनचा संकल्प आहे.प्रकल्पाच्या देखरेखीची जबाबदारी विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे ज्येष्ठ वैज्ञानिक मिलिंद कुळकर्णी यांच्याकडे आहे. कुळकर्णी म्हणतात, प्रकल्पाच्या तिसºया व अंतिम टप्प्यात सुपर कम्प्युटर्सची सारी सिस्टिम भारतात तयार होईल. तथापि त्यापूर्वी पहिल्या टप्प्यात ३ सुपर कम्प्युटर्स परदेशातून आयात केले जातील. अन्य ३ कम्प्युटर्सच्या सुट्या भागांची निर्मितीही परदेशातच होईल मात्र त्याची जोडणी भारतात ‘सी डॅक’ मार्फत केली जाईल.फ्लोटिंग पॉर्इंट आॅपरेशन्स प्रति सेकंद (फ्लॉप्स) हे गणनात्मक क्षमता मोजण्याचे परिमाण आहे. त्यानुसार पहिल्या दोन सुपर कम्प्युटरची क्षमता २ पेटाफ्लॉप्स असेल तर उर्वरित ४ कम्प्युटरची क्षमता ५00 टेराफ्लॉप्स असेल. या ६ सुपर कम्प्युटरपैकी ४ कम्प्युटर अनुक्रमे बनारस हिंदू विद्यापीठ, कानपूर, खडगपूर व हैद्राबाद आयआयटीत दाखल होतील.अन्य दोन कम्प्युटर्स पुण्याच्या ‘इंडियन इस्टिटयूट आॅफ सायन्स एज्युकेशन अँड रीसर्च’ तसेच बंगलुरूच्या ‘इंडियन इस्टिट्यूट आॅफ सायन्स’मधे कार्यरत होतील. यंदा वर्षअखेरीला हे काम पूर्णत्वाला जावे, असा मंत्रालयाचा संकल्प आहे, असे विज्ञान तंत्रज्ञान सचिव आशुतोष वर्मा यांनी सांगितले.
पुण्यात बनविणार ५० स्वदेशी महासंगणक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 3:56 AM