नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशातलं वातावरण पेटलं आहे. अनेक राज्यांमध्ये आंदोलनांना हिंसक वळण लागल्यानंतर राजकीय पक्षदेखील सक्रीय झाले आहेत. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींनी नव्या कायद्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. तर पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधींनी इंडिया गेट परिसरात दाखल होत आंदोलनात सहभागी नोंदवत मोदी सरकारवर तोफ डागली. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी गरिबांच्या विरोधात आहे. देशातील गरीब जनतेला नव्या कायद्यांचा सर्वाधिक फटका बसणार आहे. अशा परिस्थितीत मोलमजुरांनी काय करायचं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जनता ३०-३५ वर्ष जुनी कागदपत्रं कशी दाखवणार? मोदी सरकार देशाला कोणती परिस्थिती निर्माण करू पाहात आहे?, असे प्रश्न त्यांनी विचारले. नोटबंदीवेळी देशातील जनता रांगेत उभी राहिली होती. आताही त्याचप्रकारे देश रांगेत उभा राहावा, असं सरकारला वाटतं, अशा शब्दांत प्रियंका गांधींनी केंद्राला लक्ष्य केलं.
नोटबंदीसारख्या रांगा देशात पुन्हा लागाव्यात हीच सरकारची इच्छा- प्रियंका गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 11:19 PM