नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकमध्ये 12,700 कोटी रुपयांचा घोटाळा करुन पलायन करणा-या नीरव मोदी व मेहुल चोकसीला केंद्र सरकार भारतात आणणार असल्याचे विधान संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. 'टाईम्स नेटवर्क'च्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. एनडीएनं भ्रष्टाचारमुक्त सरकार दिल्याचाही दावा यावेळी त्यांनी केला. पीएनबी घोटाळ्याबाबत पुढे त्या असंही म्हणाल्या की, भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. शिवाय, सुधारणा करण्याची सरकारची तयारी असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितले. दरम्यान, जीएसटीची अंमलबजावणी हे मोठे व महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं.
सुरुवातीच्या काळात जीएसटीमध्ये काही प्रमाणात समस्या निर्माण होऊ शकतात, मात्र सरकारनं या निर्णयाची यशस्वीरित्या अंमलबजावणी केली असून यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र सुधारणांसाठी सरकार कटीबद्ध आहे आणि जीएसटीसारखे धाडसी निर्णय सरकारनं घेतले आहेत.
कोण आहे नीरव मोदी ?नीरव मोदी हा हिरेव्यापारी असून त्याची फायरस्टार डायमंड ही कंपनी आहे. त्याला 'नीरव मोदी डायमंड ब्रँड' या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 लग्झरी स्टोअर्स आहेत. नीरव मोदी यांच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. 47 वर्षीय नीरवचे वडील देखील हिरेव्यापारीच होते. नीरव वॉर्टन महाविद्यालयात शिकत असतानाच वडिलांचा व्यवसाय थंडावला. त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडून बेल्जियममध्ये परतावे लागले. यानंतर नीरव मोदी भारतात आला. नीरवला भारतातील 'डायमंड किंग' असंही संबोधलं जातं. नीरव मोदी फोर्ब्ज या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी यांची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.