नवी दिल्ली : भारताला एकाच वेळी चीन व पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर मुकाबला करण्याची वेळ येणारच नाही. पण तशी ती आली, तर त्यास आम्ही सक्षम व तयार आहोत. कोणत्याही युद्धाचे आव्हान आम्ही स्वीकारू, असे प्रतिपादन हवाई दलप्रमुख बी.एस. धनोआ यांनी गुरुवारी व्यक्त केले.
वायु सेना दिनाच्या आदल्या दिवशी ते म्हणाले की, अशा आॅपरेशनसाठी हवाई दल तयार आहे. पण, कोणत्याही सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय सरकारला घ्यायचा असतो. आम्ही आव्हानासाठी तयार आहोत. सैैन्य दलाचे प्रमुख बिपिन रावत यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते की, वेगळ्या आघाड्यांवरून लढण्यास सज्ज राहण्याची गरज आहे.भारतीय लष्करात महत्त्वाकांक्षी सुधारणांच्या अंमलबजावणी कामाचा संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आढावा घेतला. संरक्षण दलाच्या लढण्याच्या क्षमतेला वाढवण्यासाठी अधिकारी आणि इतर स्तरावरील अशा ५७ हजार जणांना पुन्हा तैनात केले जात आहे. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. बी. शेकटकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशींनुसार आॅगस्ट महिन्यात सरकारने लष्करात सुधारणांची तयारी सुरू केली आहे.