आज दिल्लीतील पोलिसांचा ७६ वा रायझिंग परेड डे साजरा झाला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हजेरी लावली. यावेळी शाह यांनी एक मोठी घोषणा केली. 'भारतीय दंड संहिता अर्थात IPC, फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजेच CRPC आणि पुरावा कायदा यातील काही कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.
'माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे की मी ७५ वर्षांहून अधिक काळाच्या वारशाचा एक भाग आहे. दिल्ली पोलीस हे स्वातंत्र्यापासून आजपर्यंतच्या कामासाठी ओळखले जाते आणि संपूर्ण देशाने त्यांचे कौतुक केले आहे. सेवेत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो . स्वातंत्र्यानंतर दिल्ली पोलिसांनी शांती, सेवा, न्यायचा नारा देत आपल्या कामात आणि कार्यपद्धतीत बदल घडवून आणले, जे देशासाठी फायदेशीर आहेत, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, भारतीय दंड संहिता अर्थात IPC, फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजेच CRPC आणि पुरावा कायदा यातील काही कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत.'स्वातंत्र्यापूर्वी पोलिसांच्या कामात सेवेचे नाव नव्हते, पण आता सेवेची भावना निर्माण झाली आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात दिल्ली पोलिसांच्या योगदानाचे खूप कौतुक करण्यात आले. दिल्लीत राहणार्या भारतीय नागरिकांना त्यांच्या पासपोर्टची काळजी करण्याची गरज नाही कारण त्यांना आता 5 दिवसात पोलीस क्लिअरन्स मिळणार आहे. मोबाईल कॅमेऱ्याद्वारे पासपोर्ट सेवेची पडताळणी केली जाईल.
'भारताची कायदा आणि सुव्यवस्था, सुरक्षेमध्ये 2014 पासून सकारात्मक विकास झाला आहे. पूर्वी काश्मीरमध्ये दररोज निदर्शने, दगडफेक आणि जाळपोळ व्हायची. आज काश्मीर पर्यटकांनी भरलेला आहे. काश्मीरचा विचार करताना, देशभर फिरताना देशातील नागरिकांना खूप सशक्त वाटते. डाव्या राजकारणाची आणि अतिरेकीपणाची उदाहरणे आता बरीच कमी झाली आहेत, असंही अमित शाह म्हणाले.
देशाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेपासून ते जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी तसेच दगडफेक करणार्यांवर ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली, ते कोणापासूनही लपलेले नाही. दिल्ली पोलिसांना मोबाईल फॉरेन्सिक सायन्स व्हॅन उपलब्ध करून दिल्याने गुन्ह्यांची प्रकरणे लवकरात लवकर सोडवण्यात आणि पुरावे गोळा करण्यात मदत होईल, असंही शाह म्हणाले.