नवी दिल्ली : मद्य धोरणप्रकरणी ईडीने अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार देत त्यांच्या याचिकेवर ३ एप्रिलपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. दिल्लीचे सरकार तुरुंगातून चालू देणार नाही, अशी कठोर भूमिका उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी घेतली आहे. उपराज्यपालांच्या विधानामुळे दिल्लीच्या राजकारणात हालचाली वाढण्याची शक्यता आहे.
केजरीवाल यांची ईडी कोठडी उद्या संपणार असून, त्यांना राऊज ॲव्हेन्यूच्या पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येईल. केजरीवाल यांची उद्या ईडीची कोठडी संपताच त्यांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआय सज्ज झाली आहे. दरम्यान, आज ईडीने ‘आप’चे नेते, गोव्याचे प्रभारी आणि दिल्ली महापालिकेचे सहप्रभारी दीपक सिंगला यांच्या घरी धाड घातली.
‘मैं भी केजरीवाल’ आज दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीचे मंत्री आणि आमदारांनी पिवळे टी-शर्ट घालून ‘मैं भी केजरीवाल’च्या घोषणा देत मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध केला.
पैसा कुठे गेला? केजरीवालच सांगणारमद्य धोरण प्रकरणातील पैसा कुठे गेला, याची माहिती केजरीवाल उद्या, २८ मार्च रोजी न्यायालयात साऱ्या देशाला सांगतील, असा दावा त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी केला. मधुमेहग्रस्त केजरीवाल यांची शुगरची पातळी घसरल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे.