नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची विशेष सुरक्षा (एसपीजी) हटविण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. आता मनमोहन सिंग यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, सुरक्षेचा निर्णय पूर्णपणे प्रफेशनल आधारावर घेण्यात आला आहे. ठरविक वेळेनंतर सुरक्षेचा आढावा घेण्यात येतो. त्यानंतर सुरक्षा हटविण्याचा निर्णय घेतला जातो. आता मनमोहन सिंग यांना झेड प्लस सुरक्षा पुरविली जाणार आहे.
एसपीजी सुरक्षा सध्या देशातील फक्त चार जणांना दिली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना एसपीजी सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच, धोक्याची शक्यता असल्यास पंतप्रधानांच्या कुटुंबीयांना सुद्धा एसपीजी सुरक्षा दिली जाते.
दरम्यान, गेल्या महिन्यात देशातील काही नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, बहुजन समाज पार्टीचे खासदार सतीश चंद्र मिश्रा, उत्तर प्रदेशातील भाजपाचे नेता संगीत सोम, भाजपाचे खासदार राजीव प्रताप रुडी यांची सुरक्षा कमी केली आहे. याशिवाय, सुरेश राणा, लोक जनता पार्टीचे खासदार चिराग पासवान, माजी खासदार पप्पू यादव यांच्याही सुरक्षेमध्ये घट करण्यात आली आहे.