दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आज आपने पत्रकार परिषद घेत भाजपा आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी अबकारी घोटाळा, केजरीवाल यांच्याविरोधात उभा केलेला सरकारी साक्षीदार आणि इलेक्टोरल बाँड यांच्या संबंधांचा पुरावा माध्यमांसमोर ठेवला आहे. तसेच ईडी फक्त या लोकांच्या जबाबावरून कारवाई करत आहे, पैशांची देवानघेवान सिद्ध करता आलेली नाही, असा आरोपही आतिशी यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयानेही ईडीला पैशांची देवानघेवान कुठे आहे, असे विचारले आहे. अरविंद केजरीवाल यांची अटक ही शरथ रेड्डी यांच्या जबाबावरून करण्यात आली आहे. आरोपी व सरकारी साक्षीदार शरथ रेड्डी हे अरबिंदो फार्माचे एमडी आहेत. अन्य हेल्थकेअर कंपन्याही चालवितात. त्यांना ९ मार्चला चौकशीला बोलविण्यात आले होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांनी केजरीवालांना भेटलेलो नाही, माझा आपशी काही संबंध नाही असे ईडीला सांगितले होते. आता कित्येक महिन्यांनी त्यांनी आपला जबाब बदलला आहे. त्यांना जामिन मिळाला आहे. परंतु पैशांचा पुरावा सापडलेला नाहीय, असे आतिशी म्हणाल्या.
याचबरोबर आतिशी यांनी निवडणूक रोख्यांचे कागदपत्र दाखवत याच रेड्डी यांच्या कंपन्यांनी भाजपाला आधी इलेक्टोरल बाँडद्वारे साडे चार कोटी रुपये दिले होते. इंडो फार्मा, एपीएल हेल्थकेअर या कंपन्या रेड्डी यांच्याच आहेत. त्यांच्या अटकेनंतर या कंपन्यांनी भाजपाला ५५ कोटींच्या देणग्या दिल्या आहेत. आता मनी ट्रेल समजला आहे, सर्व पैसा भाजपाच्या खात्यावर गेला आहे, असा आरोप आतिशी यांनी केला आहे.
एवढा पैसा भाजपाकडे गेला, आता भाजपालाच आरोपी केले गेले पाहिजे. भाजपाने अबकारी घोटाळ्यातील आरोपी रेड्डीकडून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसा घेतला आहे. ही रक्कम ५९.४ कोटी रुपये होत आहे, असा आरोप आतिशी यांनी केला आहे.