नवी दिल्ली: सध्या एक देश, एक निवडणूक यावर जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे. विरोधकांनी एक देश, एक निवडणूक या चर्चेत सहभागी व्हावं, असं आवाहन मोदींनी केलं आहे. यानंतर आता मोदी सरकारनं एक देश, एक रेशनकार्ड योजनेवर काम सुरू केलं आहे. सरकार या दिशेनं काम करत असल्याची माहिती केंद्रीय अन्न नागरी पुरवठा रामविलास पासवान यांनी दिली. देशभरात रेशनकार्ड्सची पोर्टेबिलिटी सुरू करण्यात येणार असल्याचं पासवान यांनी सांगितलं. यामुळे रेशनकार्डधारकांना देशभरातील कोणत्याही रेशनिंग दुकानातून अन्नधान्याची खरेदी करता येईल. याचा मोठा फायदा देशभरात सतत प्रवास करत असलेल्या लोकांना होईल. पासवान यांनी काल (गुरुवारी) सर्व राज्यांच्या खाद्य सचिवांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी एक देश एक रेशनकार्ड या योजनेवर भाष्य केलं. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अंतर्गत रेशनकार्ड्सचं केंद्रीय संग्रह केंद्र तयार केलं जाईल, असं पासवान म्हणाले. रेशनकार्ड्सच्या डिजिटलायझेशनवर काम करा, अशी सूचना खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बैठकीला उपस्थित सर्व राज्यांच्या अधिकाऱ्यांना दिली. एक देश एक रेशनकार्ड योजना लागू झाल्यास रेशनकार्डचा वापर देशभरात कुठेही करता येऊ शकेल. आधार कार्डप्रमाणेच रेशनकार्डलादेखील एक विशिष्ट क्रमांक देण्यात येईल. त्यामुळे बोगस रेशनकार्ड्सना आळा बसेल.
'एक देश एक निवडणूक'नंतर आता 'एक देश एक रेशनकार्ड'; नव्या योजनेवर काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 9:51 AM