नवी दिल्ली - भारतीय परंपरेत लग्न आणि सोनं हे अतुट नातं बनलंय. गरिबातील गरीब व्यक्तीही आपली मुलीच्या लग्नासाठी सोन्याची शक्य तेवढी सोय करतोच. तर, मंगळसुत्र या पवित्र दागिन्याचीही सोन्याशिवाय कल्पनाच शक्य नाही. मात्र, अनेकदा हेच सोनं लग्नसारख्या पवित्र बंधनात आडकाठी ठरत, याच सोन्यावरुन रुसवे फुगवे, राजी-नाराजी होते. आता, सरकारनेही ही काहीसी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय.
नवीन वर्षात लग्न करायचा तुमचा विचार असेल तर सरकारकडून तुम्हाला सोनं मिळणार आहे. मात्र, हा लाभ केवळ आसाममधील नागरिकांनाच घेता येईल. कारण, आसाम सरकारने याबाबत निर्णय घेतला असून अरुंधती स्वर्ण योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार कमीत कमी 10 वी पर्यंत शिक्षण झालेल्या मुलीच्या लग्नात सरकारकडून 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा सोनं भेट किंवा आहेर स्वरुपात देण्यात येणार आहे.
अरुंधती स्वर्ण योजनेसाठी सरकारने काही अटीही बंधनकारक केल्या आहेत. त्यानुसार, मुलीच्या वडिलांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असावे, मुलीचे पहिलेच लग्न असावे अशीही अट या योजनेसाठी आहे. या योजनेसाठी आसाम सरकारने 300 कोटी रुपयांचे बजेट राखून ठेवले आहे. लग्नाच्या नोंदणी आणि पडताळणीनंतर सरकारकडून संबंधित मुलीच्या बँक खात्यात 30 हजार रुपये जमा होतील. त्यानंतर, सोनं खरेदीची पावती जमा करणे बंधनकारक आहे. कारण, इतर कुठलिही वस्तू या पैशाच्या माध्यमातून खरेदी करता येणार नाही. आसाम सरकारची ही योजना स्त्री जन्माचे स्वागत आणि मुलींच्या वडिलांना दिलासा देणारी आहे.