नवी दिल्ली : बिहारमध्ये यावर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने त्या राज्यावर खास मेहेरनजर दाखविली आहे. मखाना बोर्डाची स्थापना, पश्चिम कोसी कालव्यासाठी निधी, आयआयटी पाटणाची क्षमता वाढविणे, राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता, व्यवस्थापन संस्थेची स्थापना, ग्रीनफिल्ड विमानतळ तसेच, बिठा येथे ब्राऊनफिल्ड विमानतळाची उभारणी आदींचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
विकासाला गती देणारा अर्थसंकल्प : नितीशकुमार
बिहारच्या विकासाला गती देणारा, भविष्यकाळाशी सुसंगत असा यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले.
केंद्रीय मंत्री तसेच लोकजनशक्ती पार्टीचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान म्हणाले की, राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता व्यवस्थापन संस्थेमुळे पूर्व भारतातील अन्न प्रक्रिया उद्योगांना भक्कम आधार लाभणार आहे.बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीही अर्थसंकल्पातील तरतुदींचे स्वागत केले.
आंध्राकडे दुर्लक्ष, काँग्रेसची टीका
यंदाच्या अर्थसंकल्पात बिहारला मोठ्या प्रमाणावर लाभ मिळाले, मात्र एनडीएचा दुसरा घटक पक्ष असलेल्या तेलुगू देसमची सत्ता जिथे आहे त्या आंध्र प्रदेशकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. बिहारमध्ये आगामी काही महिन्यांत विधानसभा निवडणुका असून त्यामुळे त्या राज्याला केंद्र सरकारने झुकते माप दिले आहे अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली.
मधुबनी साडीची सर्वत्र चर्चा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मधुबनी चित्रकलेचा आविष्कार असलेली साडी परिधान केली होती. या साडीची सर्वत्र चर्चा होती. २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या दुलारी देवी यांनी ही साडी अर्थमंत्र्यांना भेट दिली होती. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील दौऱ्यात निर्मला सीतारामन यांनी ही साडी परिधान करावी अशी विनंती दुलारी देवी यांनी त्यांना केली होती.