हरीश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (रालोआ) काही पोक्त व्यक्तींनी वादग्रस्त तिहेरी तलाक विधेयक संसदेच्या विद्यमान अधिवेशनात मांडू नका असा इशारा दिल्यानंतरही सत्ताधारी भाजपमधील काही मंडळींनी ते पुढे रेटण्याचा निर्धार केला आहे. माहितीगार सूत्रांच्या माहितीनुसार भाजपचे नेतृत्व याच अधिवेशनात तिहेरी तलाकचे ताजे विधेयक संमत करून घेण्याची खात्री बाळगून आहेत.
राष्ट्रपतींच्या भाषणावरील आभारदर्शक ठराव, केंद्रीय अर्थसंकल्प आणि दोन मंत्रालयांवरील चर्चा पुढील आठवड्याच्या मध्यात संपून जाईल. किमान दहा विधेयके लोकसभेने आतापर्यंत संमत केली असून आणि राहिलेली विधेयकेही संमत होतील. सरकारमधील सूत्रांनी म्हटले की, कलम ३७० रद्द करणे किंवा ३५ ए रद्द करण्याचे पाऊल नजिकच्या भविष्यात टाकले जाणार नाही. परंतु, तिहेरी तलाक विधेयक संमत करण्याच्या आश्वासनाशी रालोआतील प्रमुख घटक पक्ष जनता दलाचा (यु) विरोध आहे म्हणून सरकार तडजोड करणार नाही. सरकारमध्ये तिहेरी तलाक विधेयकाशी संबंधित काम करीत असलेल्या ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याने ‘लोकमत’ला सांगितले की, तिहेरी तलाक विधेयक संमत करणे हा आमचा शब्द असून त्यास आम्ही प्रचंड जनादेशानंतर बांधील आहोत. लोकसभेत हे विधेयक भाजपच्या मित्रपक्षांशिवाय भाजपच्या स्वत:च्या बळावर सहजपणे संमत होईल एवढे पुरेसे खासदार त्याच्याकडे आहेत यात काही शंका नाही.
५४२ सदस्यांच्या लोकसभेत भाजपचे ३०३ सदस्य आहेत आणि त्याला जनता दलाच्या (यु) १७खासदारांचीगरज नाही. तथापि, २४४ सदस्यांच्या राज्यसभेत भाजपचे फक्त ७६ सदस्य आहेत म्हणून त्याला तेथे मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. भाजपला शिवसेनेचे ३, अकालींचे ३, नामनियुक्त ३ आणि ४ अपक्षांचा पाठिंबा असल्यामुळे ही संख्या ८९ होते.जनता दल (यु) चा पाठिंबा नाहीराज्यसभेत जनता दलाचे (यु) फक्त ६ खासदार आहेत. आम्ही संसदेत तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा देणार नाही हे जनता दलाने (यु) भाजपच्या नेतृत्वाला स्पष्ट केले आहे.