नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची भारतीय जनता पार्टीसाेबत जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे आयाेजित एका भव्य ‘मुशायरा’मध्ये आझाद यांच्यासाठी माेदी सरकारने रेड कार्पेट अंथरले. याशिवाय आझाद यांचे छायाचित्र असलेले बॅनर्स आणि पाेस्टर्सही कार्यक्रमस्थळी लावण्यात आले हाेते. माेदी सरकारने आयाेजित केलेल्या कार्यक्रमात काँग्रेस नेत्याचे पाेस्टर्स दिल्लीमध्ये प्रथमच झळकले आहेत.
गुलाम नबी आझाद यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ नुकताच संपला. मावळत्या सदस्यांना निराेप देताना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गुलाम नबी आझाद यांची ताेंडभरून स्तुती केली हाेती. त्यांच्याबाबत बाेलताना माेदींचे डाेळेही पाणावले हाेते. माेदींकडून आझाद यांची स्तुती ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले हाेते. त्यानंतर आता भाजपने त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरून जंगी स्वागत केले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि जितेंद्र सिंग यांनी आझाद यांचे स्वागत केले. सिंग आणि आझाद हे दाेघेही मूळचे जम्मू आणि काश्मीरचे आहेत.
आझाद साईडलाईन झाल्याचे चित्र
कार्यकाळ संपल्यानंतर काँग्रेसने त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठविले नाही. तसेच त्यांना इतरही महत्त्वाची जबाबदारीही दिलेली नाही. एकेकाळी काँग्रेसचे नेते माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या ते अतिशय जवळचे हाेते. अलीकडच्या काळात ते साईडलाईन झालेले दिसून आले. ‘मुशायरा’ कार्यक्रमात आझाद यांना देण्यात आलेले महत्त्व आणि आदरातिथ्यामुळे ते भाजपच्या जवळ जात असल्याचे बाेलले जात आहे.