नवी दिल्ली : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा माहीत नाही, हे सरकारने लोकसभेत दिलेले स्पष्टीकरण नव्या राजकीय संघर्षाचे कारण ठरले आहे. काँग्रेसने बुधवारी या निमित्ताने राज्यसभेत सरकारवर जोरदार तोफ डागली. दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही, असे सांगून मोदी सरकारने देशाची प्रतिमा मलिन केली, असा आरोप काँग्रेसने केला. अन्य विरोधी पक्षांनीही यास दुजोरा देत, यासंदर्भात स्पष्टीकरणाची मागणी केली.राज्यसभेत शून्य प्रहरादरम्यान विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी हा मुद्दा उचलून धरला. दाऊद पाकिस्तानात दडून बसला आहे, यावर आधीचे सरकार कायम राहिले. गत २०-२२ वर्षांत मग ते अटल बिहारी वाजपेयी सरकार असो वा कॉंग्रेस सरकार असो. दाऊद पाकिस्तानात असल्याचे या सरकारांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून ठणकावून सांगितले आहे. असे असतानाच, दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही, असे सरकारने सांगणे हे दु:खद आहे. यामुळे देशाची प्रतिमा खराब झाली आहे, असे आझाद म्हणाले. माकपाचे सीताराम येचुरी यांनीही आझाद यांना दुजोरा दिला आणि गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाची मागणी केली. यावर संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सभागृहाची भावना गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन दिले. दाऊद भारताचा गुन्हेगार आहे. तो पाकिस्तानात आहे, असे ते म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)गृहमंत्र्यांच्या माहितीत तफावत> मंगळवारी लोकसभेत नित्यानंद राय यांच्या प्रश्नाच्या लिखित उत्तरादाखल गृहराज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी दाऊदचा ठावठिकाणा माहीत नसल्याचे धक्कादायक उत्तर दिले होते. दाऊदच्या ठावठिकाण्याचा शोध अद्याप लागलेला नाही. > तो कुठे आहे हे कळल्यानंतर प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे ते म्हणाले होते. भारताने दाऊदबद्दल माहितीचे अनेक दस्तऐवज यापूर्वीच पाकिस्तानला दिले आहेत. यात त्याच्या पाकिस्तानातील ठावठिकाण्यांचीही माहिती आहे. > दाऊद भारतातून फरार असून, त्याला देशाकडे सुपूर्द करण्याचे आवाहन पाकिस्तानला वेळोवेळी करण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री राजनाथसिंह यांनी २७ डिसेंबर २०१४ रोजी लखनौत बोलताना दिली होती> त्याच दिवशी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिल्लीत बोलताना दाऊदविरुद्ध सबळ पुरावे असून, त्याला भारताकडे सोपविण्याची मागणी पाकिस्तानकडे केली असल्याचा दावा केला होता.
सरकारच्या विधानाने देशाची प्रतिमा मलिन
By admin | Published: May 07, 2015 1:31 AM