'फिगर खराब होईल म्हणून शहरातील तरुणी तान्ह्या मुलांना स्तनपान करत नाहीत'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 09:45 AM2018-06-21T09:45:08+5:302018-06-21T09:45:08+5:30
मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचं विधान
इंदूर: शहरातील तरुणी फिगर खराब होईल म्हणून तान्ह्या मुलांना स्तनपान करत नाहीत, असं मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी म्हटलं आहे. या विधानामुळे आनंदीबेन पटेल पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. शहरात राहणाऱ्या आजच्या तरुणी लहान मुलांना बाटलीनं दूध पाजतात. त्यामुळे जशी बाटली फुटते, तसं मुलांचं नशीब फुटतं, असंही पटेल म्हणाल्या. त्या इंदूरमधील काशीपुरी अंगणवाडी केंद्रातील महिलांशी संवाद साधत होत्या.
'मुलांना बाटलीतून दूध पाजू नका. याचा फिगरशी कोणताही संबंध नाही,' असं आनंदीबेन पटेल अंगणवाडी सेविकांशी संवाद साधताना म्हणाल्या. 'प्रसुत झाल्यावर सरकारकडून दिले जाणारे पैसे सांभाळून खर्च करा. ते पैसे पतीकडे देऊ नका. त्या पैशांमध्ये फळं खरेदी करा. त्यामुळे तुमचं मूल सुदृढ होईल,' असं आनंदीबेन पटेल म्हणाल्या. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून अंगणवाड्यांचा अहवालदेखील मागितला. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी रजनीश सिन्हा यांनी त्यांना कुपोषित मुलांबद्दलची माहिती दिली.
दोन दिवसांपूर्वी आनंदीबेन पटेल यांनी हरदा जिल्ह्यातील टिमरनीमधील अंगणवाडी सेविकांशी संवाद साधताना वादग्रस्त विधान केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी अविवाहित असूनही त्यांना प्रसुतीवेळी आणि प्रसुतीनंतर महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांची जाणीव आहे, असं पटेल यांनी म्हटलं होतं. आनंदीबेन यांच्या या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. पंतप्रधान मोदी विवाहित असूनही आनंदीबेन यांनी त्यांना अविवाहित म्हटल्यानं उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. 'तुमच्या मुलांसाठी, तुमच्यासाठी 'त्यांनी' लग्न केलं नाही, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. नरेंद्र भाईंनी लग्न केलेलं नसलं, तरीही प्रसुतीवेळी आणि प्रसुतीनंतर महिलांना आणि मुलांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, याची त्यांना कल्पना आहे,' असं आनंदीबेन यांनी म्हणाल्या होत्या.