जुन्नर: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वयाच्या ७९ वर्षी पायी चालत शिवनेरी किल्ला सर केला. अशा पद्धतीनं पायी शिवनेरी किल्ला सर करणारे ते पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. राज्यपालांनी पायीच हा गड सर केल्याने सर्वच जण चकित झाले आहेत. यावेळी 'यहाँ आकर अच्छा लगा. हम बहुत छोटे लोग है, हेलिकॉप्टरसे आते नही. शिवाजी महाराज इस किले पर पैदल आते थे, हम भी पैदल आहे है. ये पहाडी तो हमारे लिए कुछ भी नही है,' असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटल्यानं सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शिवनेरीला भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेबांचं दर्शन घेतलं. तत्पूर्वी राज्यपालांनी पायीच हा गड सर केला. त्याचवेळी आतापर्यंत राज्याचे कोणतेच मुख्यमंत्री किल्ले शिवनेरीवर पायी चालत आले नाहीत. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, ''शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन होणे हा माझ्या भाग्याचा क्षण आहे. शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्तीमत्व नव्हते तर ते अवतारी पुरुष होते.
त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून प्रेरणा मिळते. ते खरे पूजनीय आदर्श आहेत.'' शिवजन्मस्थळी आल्यावर महाराजांच्या आयुष्यातील कर्तृत्व प्रवासाकडे लक्ष जाते, असं म्हणत शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे तान्हाजी मालुसरे, हंबीरराव मोहिते यांचीही आठवण कोश्यारी यांनी काढली. पुढच्या काळात काळात राम, कृष्ण, गुरु गोविंदसिंग, शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत जेणे करून जग आपल्या देशाकडे तिरक्या नजरेने पाहू शकणार नाही, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी संपूर्ण गडाची माहिती घेतली. गडावरील शिवाई देवतेची आरती करून विविध वास्तूंची माहिती घेतली. गडावरील विविध झाडांची नावे विचारत आणि मनमोकळ्या गप्पा मारत त्यांनी शिवनेरीचा फेरफटका मारला.
शिवकुंज इमारतीतील राजमाता जिजाऊ आणि बालशिवबांच्या प्रतिमेशी ते लीन होऊन नतमस्तक झाले. शिवजन्मस्थळी शिवाजी महाराजांच्या पाळण्याची पूजा करत तेथील महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आली असून त्यांनी शिवनेरी गडाची पायी चढून पाहणी केली. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक डॉ.राजेंद्र यादव उपस्थित होते. किल्ल्यांचे संवर्धन करायचे असेल तर ते दत्तक दिले पाहिजेत. प्रत्येक मंत्र्याला एक किल्ला संवर्धनासाठी दिला पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केले.
हे पण वाचा-
...पुन्हा आबांनी मुलांचा अभ्यास घेण्याचा प्रयत्न केला नाही; रोहित पाटलांकडून आठवणींना उजाळा
मला माझं काम करु द्या, पार्थ प्रकरणावर बोलण्यास अजितदादांचा नकार
अलविदा रॉकी! गुन्हेगारांचा कर्दनकाळ काळाच्या पडद्याआड; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार