पाली (राजस्थान) - राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरला शनिवारी तांत्रिक बिघाडामुळे पाली येथे अपघात झाला. सुदैवाने बागडे त्या हेलिकॉप्टरमध्ये नव्हते. ते सुखरूप आहेत, असे राजस्थान पोलिसांनी सांगितले.
राज्यपाल बागडे हे शनिवारी दोन दिवसांच्या पाली दौऱ्यावर आले होते. दुपारी त्यांचे हेलिकॉप्टर अजमेर येथून पाली शासकीय कन्या महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर पोहोचले. नंतर ते नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले. दरम्यान, हेलिकॉप्टरने जयपूरला परत जाण्यास उड्डाण भरले. तेव्हा हेलिकॉप्टरच्या पंख्यांत स्फोट झाला. वैमानिकाने प्रसंगावधान राखून ते सुखरूप उतरविले. पोलिसांनी सांगितले की, दुर्घटना घडली तेव्हा बागडे हेलिकॉप्टरमध्ये नव्हते.