ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. 4 - पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी फोनवरून धमकी देत अपमान केल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केला होता. मात्र ममतांचा हा आरोप राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी फेटाळून लावला आहे. राजभवनातून राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिलं आहे. या पत्रकात त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबत कोणतंही आक्षेपार्ह विधान केलं नसल्याचा खुलासा केला आहे.ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या, भाजपाच्या एखाद्या ब्लॉक अध्यक्षाने बोलावे अशा भाषेत बोलून राज्यपालांनी जनतेने निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांचा अपमान केला आहे. उभ्या आयुष्यात अशा पद्धतीने कोणी मला अपमानित केले नव्हते. राज्यपाल ज्या पद्धतीने माझ्याशी बोलले ते ऐकून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असा विचारही माझ्या मनात डोकावून गेला.राज्यपालांच्या आक्षेपार्ह विधानावर आपण तीव्र नाराजी व्यक्त केलीय. तसेच त्रिपाठी यांनाही खडे बोल सुनावल्याचंही बॅनर्जी म्हणाल्या आहेत. ममता म्हणाल्या, मी तुमच्या मेहरबानीने मुख्यमंत्री झाले नाही, मला लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे आपण घटनात्मक पदावर असलात तरी मुख्यमंत्र्यांशी अशा भाषेत बोलू शकत नाही, असंही मी त्यांना सुनावले आहे.
ममतांना धमकी दिल्याचा आरोप राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठींनी फेटाळला
By admin | Published: July 04, 2017 9:16 PM