नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने फटाके विक्रीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सडाडून टीका करणारे त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी पुन्हा एकदा परखडपणे आपलं मत मांडलं आहे. दिवाळी फटाके फोडण्याचं समर्थन करताना तथागत रॉय बोलले आहेत की, 'दिवाळीला फटाक्यांमुळे होणा-या ध्वनी प्रदूषणावरुन युद्ध सुरु होतं, पण पहाटे साडे चार वाजता सुरु होणा-या अजानावर कोणी बोलत नाही'. मंगळवारी तथागत रॉय यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडलं. तथागत रॉय यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'प्रत्येक दिवाळीला फटाक्यांमुळे होणा-या ध्वनी प्रदूषणावरुन युद्ध सुरु होतं. वर्षातील फक्त काही दिवस. पण पहाटे साडे चार वाजता सुरु होणा-या अजानवरुन कोणतीच चर्चा होत नाही'.
पुढील ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'अजानमुळे होणा-या ध्वनी प्रदूषणावर धर्मनिरपेक्ष लोकांचं शांत बसणं मला हैराण करतय'. 'लाऊडस्पीकरच्या माध्यमातून शिक्षण दिलं पाहिजे असं कुराणमध्ये कुठेच लिहिलेलं नाही', असंही तथागत रॉय बोलले आहेत.
एखाद्या व्यक्तीने मस्जिदवर लावण्यात येणा-या लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गायक सोनू निगमने एप्रिल महिन्यात हा मुद्दा उपस्थित केला होता, ज्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी सोनू निगमवर टीका केली होती. पण समर्थन करणा-यांची संख्याही तितकीच होती.
याआधीही तथागत रॉय यांनी फटाकेबंदीवर आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हिंदूविरोधी असल्याचं म्हटलं होतं. ट्विटरच्या माध्यमातून तथागत रॉय यांनी आपली नाराजी व्यक्त करत निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने फटाकेबंदीचा दिलेला निर्णय गतवर्षी असहिष्णूता वाढल्याचा आरोप करत पुरस्कार परत करणा-या कलाकार आणि लेखकांपासून प्रभावित झाल्याचंही तथागत रॉय बोलले होते. 'कधी दहीहंडी, आज फटाके, उद्या कदाचित प्रदूषणाचा दाखला देत मेणबत्ती आणि पुरस्कार वापसी गँग हिंदूंच्या चिता जाळण्याविरोधात याचिका करेल', असं ट्विट करत तथागत रॉय यांनी पुरस्कार परत करणा-यांवर टीका केली होती.