केंद्रीयमंत्री आणि भाजपा नेते बाबुल सुप्रियो यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते जात होते. त्यावेळी, जादवपूर विद्यापीठात तेथील काही विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तणूक केली. सध्या, सोशल मीडियावर बाबुल यांचा एक फोटो व्हायरल होत असून विद्यार्थ्याकडून त्यांच्यावर हात उचलण्यात आल्याचं दिसून येतंय. यूनियन स्टूडेंट्स ड्रेमोक्रेटिक फ्रंट या विद्यार्थी संघटनेचा तो सदस्य आहे.
कॉम्रेडप्रणित डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी बाबुल सुप्रियो यांना धक्काबुक्की केली आहे. विशेष म्हणजे तब्बल 6 तास या मंत्रीमहोदयांना विद्यार्थ्यांकडून घेराव घालण्यात आला होता. याबाबतची माहिती मिळताच, राज्यपाल जगदीप धनकड यांनीही तात्काळ जादवपूर विद्यापीठात धाव घेतली. त्यानंतर, सुप्रियो यांना आपल्या गाडीत बसवून राजभवन येथे नेले. बाबुल सुप्रियो हे आसनसोल लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडूण आले आहेत. याप्रकरणी स्वत: सुप्रियो यांनी ट्विट करुन ममता बॅनर्जी यांना प्रकरणाची दखल घेण्याचं सूचवलं आहे. आम्ही त्या मुलाचा शोध घेऊ, त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काय कारवाई करतील? हेच पाहायचंय असेही सुप्रियो यांनी म्हटलंय.
दरम्यान, सुप्रियो यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन धक्काबुक्की करणाऱ्या मुलांच्या फेसबुक अकाऊंटचे स्क्रीन शॉट शेअर केले आहेत.