नवी दिल्ली/कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वाहनांच्या पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीवर राज्यपाल जगदीप धानकर यांच्याकडून केंद्र सरकारला शुक्रवारी अहवाल मिळाला. नड्डा यांच्या दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल भेटीत ‘गंभीर स्वरूपाचे सुरक्षा दोष’ राहिल्याबद्दल गृहमंत्रालयाने मागणी करूनही राज्य सरकारने अहवाल पाठविलेला नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. नड्डा यांच्या वाहनांच्या पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेली वक्तव्ये मागे घ्यावीत, असे जगदीप धानकर यांनी शुक्रवारी म्हटले व ममता बॅनर्जी कृपया आगीशी खेळू नका, असा इशाराही दिला. गुरुवारी झालेली हल्ल्याची घटना फारच दुर्दैवी होती, असेही ते म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे १९ व २० डिसेंबर रोजी राज्य भेटीवर येतील.
हल्ल्याप्रकरणी राज्यपालांचा अहवाल केंद्र सरकारला सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 7:04 AM