जमुई - झारखंड राज्यात पोलीस शिपाई भरती सुरू आहे. शारिरीक चाचणीसाठी विविध जिल्ह्यात धावस्पर्धा घेण्यात येत आहे. मात्र या मैदानी चाचणीत ११ उमेदवारांच्या मृ्त्यूनं खळबळ माजली आहे. यात बिहारच्या एका युवकाचा जीव गेला आहे. मोठ्या भावाच्या जाण्यानं छोट्या भावाला धक्का बसला आहे. या दुर्दैवी घटनेनं युवकाच्या कुटुंबासह गावात शोककळा पसरली आहे.
बिहारच्या जमुई जिल्ह्याच्या गंगरा गावातील २ भाऊ २७ ऑगस्टला झारखंड गिरिडीह येथे शिपाई भरतीत उतरले होते. यावेळी २८ ऑगस्टला धावण्याची स्पर्धा होती. पहाटे ५ वाजता त्याला सुरुवात होणार होती. सर्व उमेदवार ५ वाजल्यापासून रांगेत उभे होते परंतु ११ वाजता धावण्याची स्पर्धा सुरू झाली. भीषण उष्णतेमुळे गोविंद कुमारसह अनेक उमेदवार धावताना बेशुद्ध पडले.
छोट्या भावाने स्पर्धा अर्धवट सोडली...
उष्णतेमुळे छोट्या भावाने २ राऊंडनंतर मैदान सोडले मात्र मोठा भाऊ गोविंद कुमार नोकरी मिळवण्याच्या जिद्दीनं धावत राहिला. स्पर्धा अर्धवट सोडून छोटा भाऊ मोठ्या भावाची वाट पाहत होता. तेव्हा सूचना मिळाली की जवळपास १२ उमेदवार चक्कर येऊन कोसळले आहेत. गोविंद कुमारची स्थिती चिंताजनक असल्याने त्याला प्राथमिक उपचारानंतर गिरिडिहच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले. मात्र त्याठिकाणाहून रात्री त्याला धनबादला नेण्यात आले.
धनबादमध्येही गोविंद कुमारची प्रकृती सुधारत नसल्याने त्याला रांचीला हलवलं परंतु त्याठिकाणी २ तास वाट बघितल्यानंतरही तिथे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले नाही त्यातच गोविंदचा मृत्यू झाला. गोविंदच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत. घरातील एकमेव कमवता मुलगा गेल्याने कुटुंब कोलमडलं आहे. गोविंद गंगरा पंचायतीत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत होता.
सरकारकडे मदतीची मागणी
गोविंदच्या मृत्यूनं त्याच्या वडिलांचा आधार गेला आहे. गोविंदचे वडील आणि छोटा भाऊ निर्मित यांनी गोविंदच्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे गोविंदचा जीव गेल्याने त्याची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी तसेच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी अशी मागणी कुटुंबाने सरकारकडे केली आहे.