शासन आणि प्रशासन व्यवस्थेबाबत सातत्याने मोठमोठे दावे करताना दिसतात. पण ग्राउंड रिएलिटी यापेक्षा पूर्ण वेगळी आहे. हे दावे पोकळ दावे असल्याची एक घटना खांडवा जिल्ह्यातून समोर आली आहे. कुटुंबीयांवर मुलाचा मृतदेह बाईकवरून नेण्याची वेळ आली आहे. एकीकडे मृतांच्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालयातून मृतदेह मिळत नव्हता, तर दुसरीकडे खासगी रुग्णवाहिका चालकांकडून अधिक पैशांची मागणी केली जात होती. यानंतर कुटुंबीयांना मुलाचा मृतदेह बाईकवरून घेऊन जावा लागला.
सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनावर कारवाई करण्यात येत आहे. मध्य प्रदेशच्या खंडव्यातील पिपलौद भागातील डेहरिया गावातील 4 वर्षांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. कुटुंबीय रुग्णवाहिका शोधत राहिले कारण मृतदेह त्यांच्या गावी न्यायचा होता. परंतु शासकीय रुग्णवाहिका कर्मचारी व्यवस्था नसल्याच्या तक्रारी करत राहिले. गरीब आदिवासी कुटुंबाकडे जे पैसे होते. ते उपचारादरम्यान खर्च झाले. आता घरी जाण्यासाठी पैसेच नव्हते. अखेर मुलाचा मृतदेह नेण्यासाठी कुटुंबीय बाईकवरून निघाले.
आठ दिवसांत दोन मुलांचा मृत्यू
रुग्णालयात उपस्थित असलेल्या मीडियाने जेव्हा या प्रकरणावर भाष्य केलं, फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले तेव्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी घाईघाईत रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. मुलाच्या कुटुंबातील सदस्य धर्मेंद्र यांनी सांगितले की, कुटुंबातील दोन मुलांचा 8 दिवसांत मृत्यू झाला. दोन्ही मुलांना सर्दी व ताप असल्याने गावातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. तब्येत बिघडल्याने कुटुंबीयांनी मुलांना जिल्हा रुग्णालयात नेले. आठवडाभरापूर्वीच एका मुलाचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या मुलावर उपचार सुरू होते. ज्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्यामुळे ते मृतदेह बाईकवरून घेऊन जात होते. दुसरीकडे, जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. अनिरुद्ध कौशल सांगतात की, त्यांच्याकडे मृतदेह नेण्याची व्यवस्था नाही. महापालिकेच्या वाहनाची दुरवस्था झाली आहे. ही बाब त्यांच्या निदर्शनास येताच एका खासगी सामाजिक संस्थेची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.