नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने सरकारला घसघशीत रक्कम देऊ केल्यावरुन भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली. २०१४ पासून सरकार रिझर्व्ह बँकेच्या नफ्यापैकी ९९ टक्के रक्कम घेत आहे, असा आरोप केला.
भारतातील सर्व सीपीआय-एमच्या शाखांनी अर्थव्यवस्था आणि जनतेच्या जीवनमानावर निर्दयी घाला घालण्याच्या या प्रकाराचा संघटितपणे निषेध करावा, असे आवाहनही पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीने केले आहे. मागणीचा अभाव आणि सरकारने आरबीआय लाभाशांतील एवढा मोठा निधी लाटून लादलेल्या आर्थिक बोझ्याने सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न श्रेणीतील अग्रणी कंपन्याचे मोठे नुकसान झाले आहे, असे सीताराम येचुरी यांनी ट्विट केले आहे.
दुसरीकडे, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, सरकारचा प्रयत्न वित्तीय सुजाणपणा की, वित्तीय हाराकिरी म्हणावी. अंदाजपत्रकातील आकडेमोडीतील गायब रकमेएवढीच रक्कम बँकेकडून घेण्यात आली आहे, यावरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
चोरी करून काहीही होणार नाही - राहुल गांधीरिझर्व्ह बँकेचे पैसे चोरी करून काहीही होणार नाही. स्वनिर्मित आर्थिक संकटावर काय उपाय करावा, हे पंतप्रधान आणि वित्तमंत्र्यांना सुचेनासे झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या अतिरिक्त शिलकी निधीतून पैसे घेण्याचा प्रकार म्हणजे बंदुकीच्या गोळीने झालेल्या दुर्धर जखमेवर दवाखान्यातून चोरलेली मलमपट्टी करण्यासारखा आहे, अशा परखड शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन सरकारवर निशाणा साधला.