केंद्र सरकारनं जुन्या आणि नव्या सर्वच गाड्यांना आता FASTag अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२१ पासून देशभरात हा नियम लागू होणार होता. परंतु आता सरकारनं वाहनचालकांना दिलासा देत FASTag साठी मुदतवाढ दिली आहे. सरकारनं ही मुदत आता १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयानं सर्व जुन्या गाड्यांनाही FASTag लावणं बंधनकारक केलं आहे. तर दुसरीकडे NHAI नंदेखील १ जानेवारीपासून रोख रकमेद्वारे टोल वसूली बंद केली जाणार असल्याचं म्हटलं म्हटलं होतं. FASTag ला मुदतवाढ मिळाल्यामुले तुर्तास तरी रोख टोल वसूली बंद होण्याची शक्यता नाही. सध्याच्या काळात FASTag द्वारे ७५ ते ८० टक्के टोलवसूली केली जाते.हायवे ऑथोरिटी १५ फेब्रुवारीपासून १०० टक्के कॅसलेस टोलवसूलीसाठी आवश्यक ते नियम तयार करू शकते असं एनएचएआयशी झालेल्या चर्चेदरम्यान मंत्रालयानं सांगितलं. टोल नाक्यांवरील गाड्यांच्या रांगा कमी करण्यासाठी तसंच डिजिटल ट्रान्झॅक्शनला चालना देण्यासाठी FASTag चा वापर वाढवण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. FASTag नसलेल्या गाड्यांनी या लेनमध्ये प्रवेश केल्यास त्यांच्याकडून मूळ टोलच्या रकमेच्या दुप्पट टोल वसूल करण्यात येईल. काय आहे FASTag?FASTag हा स्टिकर गाड्यांच्या समोरील काचेवर लावण्यात येतो. महामार्गावर टोल नाक्याजवळ गाडी आल्यानंतर स्कॅनर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन या तंत्रज्ञानाद्वारे तो स्टिकर स्कॅन करतो. यामुळे टोल नाक्यांवर गाडी थांबवण्याची आवश्यकता भासत नाही.कसा घ्याल FASTag ?कार, ट्रक, बस किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या खासगी आणि कमर्शिअल वाहनांना टोल नाक्यांवरून पुढे जाण्यासाठी FASTag आवश्यक असणार आहे. वाहन चालकांकडे FASTag खरेदीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. देशभरातील कोणत्याही टोल नाक्यांवरून वाहन चालकांना FASTag खरेदी करता येऊ शकतो. त्यासाठी केवळ चालकांना आपल्या गाडीच्या नोंदणीची कागदपत्रे दाखवावी लागणार आहेत. FASTag खरेदी करण्यासाठी ही केव्हायसी प्रक्रिया आहे. तर दुसरीकडे FASTag हा तुमच्या बँकेद्वारे, अॅमेझॉन, पेटीएम, एअरटेल पेमेंट बँकसारख्या ठिकाणांहूनही खरेदी करता येणार आहे. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, अॅक्सिस या बँकांमधूनही FASTag खरेदी करता येऊ शकतो.काय असेल किंमत ?FASTag ची किंमत ही दोन बाबींवर अवलंबून आहे. पहिली म्हणजे तुमचं वाहन हे कोणत्या श्रेणीतील आहे आणि दुसरी बाब म्हणजे तुम्ही FASTag कुठून विकत घेत आहात. प्रत्येक बँकेची FASTag साठी सिक्युरिटी डिपॉझिटसाठी निरनिराळी पॉलिसी आहे. जर तुम्ही पेटीएमवरून FASTag खरेदी करत असाल तर तो तुम्हाला ५०० रूपयांना मिळेल. यामधअये २५० रूपयांचं रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट आणि १५० रूपयांचा बॅलन्स देण्यात येतो. जर तुम्ही आयसीआयसीआय बँकेतून FASTag खरेदी केला तर त्यासाठी ९९ रूपयांची इश्यू फी आणि २०० रुपये डिपॉझिट म्हणून जमा करावं लागतं.
कसं कराल रिचार्ज?FASTag रिचार्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली म्हणजे ज्या बँकेतून तुम्ही ते घेतलं आहे त्याद्वारे तयार करण्यात आलेलं FASTag वॉलेट डाऊनलोड करा आणि इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे ते रिचार्ज करा. तर दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही पेटीएम, फोन पे सारख्या मोबाईल वॉलेटद्वारेही FASTag रिचार्ज करू शकता. तसंच अॅमेझॉन पे आणि गुगल पे वरही हा पर्याय उपलब्ध आहे.