पणजी : गोवा सरकार भ्रष्ट आहे आणि कोविड संकटाच्या काळात गोव्यातील सरकारने सर्वच व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार केला, असा थेट आरोप गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केल्यामुळे गोव्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. मलिक हे सध्या मेघालयाचे राज्यपाल आहेत.या भ्रष्टाचाराची माहिती पंतप्रधान मोदी यांना दिली होती. पण त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर काहीच कारवाई केली नाही व सावंत यांचे पद कायम राहिले, असेही मलिक यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. राज्यपाल या घटनात्मक पदावर काम केलेल्या व्यक्तीनेच गोवा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे सर्वच मंत्र्यांची अडचण झाली आहे.
न्यायालयीन चौकशी हवी - काँग्रेसराज्यपालपदावर काम केलेल्या व्यक्तीनेच भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने त्याचा चौकशी सीबीआय, ईडी आदी केंद्रीय यंत्रणांमार्फत तपास करावा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस व गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केली. ते म्हणाले की, मलिक यांनी काश्मीरमधील भ्रष्टाचार उघड केला, तेव्हा त्यांना गोव्यात हलविले. गोव्यातील भ्रष्टाचार त्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिला, तेव्हा त्यांना मेघालयाचे राज्यपाल केले.