नवी दिल्ली : कोरोना संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून अनेकविध प्रयत्न केले जात आहेत. ८ जानेवारी २०२० रोजी देशभरातील संपूर्ण ३३ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) घेतली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज (गुरुवारी) दिली.
संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम पार पडणार आहे. सर्व ठिकाणी आज किंवा उद्या कोरोना लस पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी प्रवासी विमानांना कोरोना लसीच्या वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती मिळाली आहे. पुणे प्रमुख केंद्र करण्यात आले असून, येथूनच संपूर्ण देशभरात कोरोना लसीचा पुरवठा केला जाणार आहे. देशभरात एकूण ४१ ठिकाणे निर्धारित करण्यात आली असून, तेथे कोरोना लस पोहोचवण्याचे काम निर्धारित करण्यात आले आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली आहे.
उत्तर भारतासाठी दिल्ली आणि करनाल मध्यवर्ती केंद्रे असतील. तर पूर्व भारतासाठी कोलकाता मुख्य केंद्र असेल. ईशान्य भारतात कोलकाता येथूनच लसींचा पुरवठा केला जाणार आहे. दक्षिण भारतासाठी चेन्नई आणि हैदराबाद मुख्य केंद्र म्हणून निवडण्यात आले आहे, असेही सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, कोरोना लसीकरणाच्या रंगीत तालमीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील आरोग्य मंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यापूर्वी झालेल्या रंगीत तालमीनंतर आलेल्या प्रतिक्रियांची दखल घेऊन सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार, संपूर्ण देशभरात ८ जानेवारी २०२१ रोजी कोरोना लसीकरणाची पुन्हा एकदा रंगीत तालीम घेण्यात येईल, असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले.
महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्येत अचानक वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना संदर्भात सावधगिरी बाळगण्याची अद्यापही अधिक प्रमाणात आवश्यकता आहे, हा त्यामागील इशारा आहे. सर्वांनी कोरोनाविरोधातील लढा कायम ठेवावा. अधिकाधिक सावधगिरी बाळगून कार्यरत राहावे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींना आपत्कालीन वापरासाठी परवागनी देण्यात आली असून, शेवटच्या व्यक्तीपर्यंत लस पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले.