नवी दिल्ली-
जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर निर्यात करतो. यातच आता देशातील साखरेच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीला थांबविण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे. रॉयटर्स या वृत्त संस्थेने याबाबतचं वृत्त दिलं असून देशांतर्गत साखरेच्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार आता गव्हानंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता आहे.
गेल्याच आठवड्यात मोदी सरकारनं देशांतर्गत गरज लक्षात घेत गहूच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यापाठोपाठ आता साखरेच्या निर्यातीवरही निर्बंध येण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सीझन काळात साखरेची निर्यात १० मिलियन टनवर मर्यादीत करण्याचाही पर्याय सरकार चाचपडून पाहात आहे.
दरवर्षी होतेय साखरेच्या निर्यातीत वाढसरकारी आकडेवारीनुसार भारतानं सप्टेंबरला समाप्त होणाऱ्या चालू आर्थिक वर्षात १८ मेपर्यंत जवळपास ७५ लाख टन साखर निर्यात केली आहे. तर २०२०-२१ या आर्थिक वर्षात ७० लाख टन साखर निर्यात झाली होती. तर २०१७-१८ या आर्थिक वर्षात ६२ लाख टन साखर निर्यात करण्यात आली होती. त्यामुळे आकडेवारी पाहिली तर दरवर्षी निर्यातीत वाढ नोंदविण्यात आली आहे.
भारताकडून साखर खरेदी करणाऱ्या देशांमध्ये इंडोनेशिया, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, यूएई, मलेशिया आणि आफ्रिकन देशांचा समावेश आहे. भारतानं जर साखर निर्यातीवर बंदी घातली तर या देशांना मोठा झटका बसणार आहे. साखर निर्मितीत देशात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये एकूण साखर निर्मितीपैकी ८० टक्के निर्मिती याच राज्यांमध्ये होते. याव्यतिरिक्त आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, ओदिशा, तामिळनाडू, बिहार, हरियाणा आणि पंजाब यांचाही समावेश आहे.
दरम्यान, केंद्र सरकारकडून साखर निर्यातीच्या बंदी बाबतची अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मंगळवारी साखर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. महत्वाची बाब म्हणजे साखर निर्यात करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये देखील घसरण पाहायला मिळाली आहे. रेणुका शुगर कंपनीचे शेअर्स ६.६६ टक्क्यांनी, बलरामपूर मिल्सचे ५ टक्के आणि धामपूर शुगरचे शेअर्स ५ टक्क्यांनी कोसळले आहेत.
साखर निर्यात बंदीनं काय होणार?देशात हंगामाच्या सुरवातीला ८५ लाख टन साखर शिल्लक होती. चालू हंगामात ३५५ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. देशांतर्गत साखरेचा वापर २८० लाख टन गृहीत धरल्या तर १६५ लाख टन साखर शिल्लक राहतं. नव्या हंगामातील साखर बाजारात येण्यास किमान ३ महिने लागतात. महिन्याला २०ते २२ लाख टन साखर देशात लागते. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीला तीन महिन्यांची म्हणजेच ६० ते ६५ लाख टन साखर शिल्लक असणे आवश्यक आहे. त्यामुळे १६५ लाख टनांपैकी १०० टनच साखरेच्या निर्यातीला परवानगी द्यावी. यापेक्षा जास्त निर्यात केल्यास देशात साखरेची टंचाई निर्माण होऊ शकते. यामुळेच केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. येत्या काही दिवसांत याबाबतची घोषणा अपेक्षित आहे.