चेन्नई : सरकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत वैयक्तिक कामासाठी मोबाइल फोन वापरू नये, असे तामिळनाडूमधील (Tamilnadu) एक न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, न्यायालयाने तमिळनाडू सरकारला (Tamilnadu Govt) याबाबत नियमावली (Regulations) बनवण्यास सांगितले आहे. हे प्रकरण मदुराईचे आहे.
येथील मद्रास उच्च न्यायालयाच्या (Madras High Court) खंडपीठाने एका सरकारी कर्मचाऱ्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हा आदेश दिला. आरोग्य विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने ही याचिका दाखल केली होती. कार्यालयीन कामकाजादरम्यान कर्मचारी मोबाईल वापरताना आढळून आली होती. त्यामुळे विभागाने तिला निलंबित केले होते. त्याविरोधात तिने न्यायालयात याचिका दाखल करून आपले निलंबन रद्द करण्याचे आदेश विभागाला द्यावेत, अशी मागणी केली होती.
याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश एस. एम. सुब्रमण्यम (Justice SM Subramaniam)यांनी या प्रकरणाच्या तपशिलात जाण्यास नकार दिला. ते म्हणाले की, आजकाल सरकारी कर्मचारी कार्यालयीन कामकाजादरम्यान वैयक्तिक कामासाठी मोबाईल फोन वापरतात हे सर्वसामान्य झाले आहे. ही चांगली प्रथा नाही. किमान सरकारी कर्मचाऱ्यांना तरी याची परवानगी देऊ नये.
यासोबतच याचिका दाखल करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. न्यायमूर्ती न्यायाधीश एस. एम. सुब्रमण्यम यांनी राज्य सरकारला यासंदर्भात चार आठवड्यांत नियम आणि कायदे तयार करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल न्यायालयासमोर सादर करा. त्यानंतरच या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.