नवी दिल्ली - पीएफ खातेधारकांना सणावारांच्या दिवसांत खूशखबर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO च्या ७ कोटी सब्स्क्रायबर्सना या महिन्याच्या अखेरीपर्यंत मोठी खूशखबर मिळणार आहे. सरकार EPF खातेधारकांच्या खात्यामध्ये २०२२ च्या आर्थिक वर्षाचे व्याज जमा करणार आहे. यावेळी ८.१ टक्के दराने व्याज मिळणार आहे. या महिन्याच्या अखेरीस ही रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. या वर्षीचा व्याजदर हा ४० वर्षांमधील सर्वात निचांकी पातळीवरील व्याजदर आहे.
जर तुमच्या पीएफ खात्यामध्ये १० लाख रुपये जमा असतील तर व्याजाच्या रूपात तुम्हाला ८१ हजार रुपये मिळतील. जर तुमच्या खात्यामध्ये ७ लाख रुपये असतील तर तुम्हाला ५६ हजार ७०० रुपये मिळतील. जर तुमच्या खात्यामध्ये पाच लाख रुपये असतील तर तुम्हाला व्याजाच्या रूपात ४० हजार ५०० रुपये मिळतील. तसेच जर तुमच्या खात्यामध्ये एक लाख रुपये असतील तर तुमच्या खात्यामध्ये ८ हजार १०० रुपये जमा होतील.
जर तुम्हाला पीएफमधील रक्कम तपासायची असल्यास तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून ०११-२२९०१४०६ वर मिसकॉल द्यावा लागेल. त्यानंतर ईपीएफओच्या मेसेजच्या माध्यमातून पीएफची माहिती मिळेल. इथेही तुम्हाला तुमचं यूएन, पॅन आणि आधारकार्ड लिंक असणं आवश्यक आहे.
तसेच तुम्ही तुमचा बॅलन्स हा ऑनलाइन, उमंग अॅपवरून आणि एसएमएसच्या माध्यमातूनही तपासू शकता. एसएमएसवरून बॅलन्स तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 7738299899 वर EPFOHO लिहून मेसेज करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बॅलन्सची माहिती मिळेल.