नवी दिल्ली - केंद्र सरकारने सैन्याला 1 लाख बुलेट प्रूफ जॅकेट (Bullet Proof Jackets) दिले आहेत. एका कार्यक्रमादरम्यान संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांनी लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्याकडे भारतात तयार करण्यात आलेली बुलेट प्रूफ जॅकेट्स सोपवली आहेत. विशेष म्हणजे बुलेट प्रूफ जॅकेट्स हे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे असून मेक इन इंडिया (Make in India) या योजनेअंतर्गत याची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान श्रीपाद नाईक यांनी आम्ही लष्कराच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे.
बुलेट प्रूफ जॅकेट्सची वेळेआधीच डिलिव्हरी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी आपल्या सैनिकांची सुरक्षा ही सर्वप्रथम आहे. त्याचबरोबर त्यांना आवश्यक असणारी शस्र आणि सुरक्षा उपकरणं उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे" असं श्रीपाद नाईक यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. या कार्यक्रमासाठी संरक्षण उत्पादन सचिव राजकुमार, लेफ्टनंट जनरल ए. के. सामंतरा, डीजी इन्फंट्री, ले. जनरल आर. के. मल्होत्रा आणि ले. जनरल एच. एस. कहलोन हे देखील उपस्थित होते,
संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. नाईक यांनी बुलेट प्रूफ जॅकेट तयार करणाऱ्या कंपनीचं देखील कौतुक केलं आहे. एसएमपीपी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने वेळेपूर्वी ही जॅकेट्स उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीपाद नाईक यांनी कंपनीचं कौतुक केलं. तसेच "मेक इन इंडिया बुलेट प्रूफ जॅकेट बनवणं हे स्वावलंबी भारत निर्माण करण्याच्या योजनेंतर्गत एक उत्तम पाऊल आहे. ही कंपनी केवळ भारतातच नव्हे तर जगभर या प्रकारच्या उत्पादनांची निर्यात करत आहे. त्यामुळे आमच्यासाठी ही सन्मानाची बाब आहे" असं नाईक यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.