नवी दिल्ली: पेटंटसाठी अर्ज करणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांसाठीच्या शिक्षण शुल्कात ८० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी ही घोषणा केली आहे. या संस्था देशात असो वा परदेशात, त्यांना या योजनेचा लाभ मिळेल, अशी माहिती गोयल यांनी दिली.
सरकारच्या स्वामित्वाखाली असणाऱ्या मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांनाच आधी शैक्षणिक शुल्कात ८० टक्के सवलत मिळायची. मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे, असं गोयल यांनी सांगितलं. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजकडून (सीआयआय) बौद्धिक संपदा विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एका वेबिनारला गोयल यांनी संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
'आता ८० टक्के शुल्क सवलत सर्व मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांना मिळेल. मग त्या संस्था सरकारी असोत वा सरकारच्या मदतीनं चालणाऱ्या खासगी असोत. त्या देशात असोत वा परदेशात असोत. त्यांना शुल्कात सवलत दिली जाईल. सर्व मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था, विद्यापीठं, शाळा आणि महाविद्यालयांना ८० टक्के सवलतीचा लाभ मिळेल,' असं गोयल म्हणाले.
शैक्षणिक शुल्कात देण्यात आलेल्या सवलतीमुळे कोणत्याही संस्थेचं प्रकाशन शुल्क ४ लाख २४ हजार ५०० रुपयांवरून ८५ हजार रुपयांवर येईल. यामुळे विद्यापीठांना खूप मोठं प्रोत्साहन मिळेल. अनेक नवी विद्यापीठं आणि शैक्षणिक संस्था याचा लाभ घेतील, अशी मला आशा आहे, असं गोयल यांनी म्हटलं.