इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या इंदूरमध्ये (Indore) वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेअंतर्गत 3 हजार सायकली खरेदी करण्यात येणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी 10 कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले.
एजन्सीच्या म्हणण्यानुसार, 'इंदूर पब्लिक सायकल सिस्टम' नावाचा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर चालवला जाईल. सर्वसामान्यांना भाड्याने अत्याधुनिक सायकली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर इंदूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सायकलचा समावेश केल्याने पर्यावरणाचे रक्षण होईल. पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी होईल आणि लोकही निरोगी राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
स्थानिक प्रशासन शहरातील बस स्टॉप आणि इतर प्रमुख सार्वजनिक ठिकाणी टप्प्याटप्प्याने सर्वसामान्यांना भाड्याने 3 सायकली उपलब्ध करून देणार आहे. मोबाईल ऍप्लिकेशनच्या मदतीने या सायकलचे कुलूप उघडून बंद होणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या सायकली जीपीएसने सुसज्ज असतील, जेणेकरून स्थानिक प्रशासनाला त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल.
अवघ्या 10 रुपयांत 10 तासांसाठी सायकल याचबरोबर, अवघ्या 10 रुपयांत अशी सायकल सर्वसामान्यांना 10 तासांसाठी उपलब्ध होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सायकलचे मासिक भाडे 349 रुपये आहे. दरम्यान, शहरातील सर्वतेब बसस्थानकाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटनही मुख्यमंत्री चौहान यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे करण्यात आले. 7878 चौरस मीटर परिसरात 14.80 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या नवीन टर्मिनलमध्ये दररोज 500 बसेस चालवल्या जातील. 79.33 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या दोन जलशुद्धीकरण प्रकल्पांचे भूमिपूजनही चौहान यांच्या हस्ते झाले. ही सुविधा सांडपाण्याचे पाणी पुन्हा वापरण्यायोग्य बनविण्याचे काम करेल.