एसपी, कलेक्टरची कॉलर धराल, तर नेते व्हाल; काँग्रेसच्या मंत्र्याचा विद्यार्थ्यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 08:47 AM2019-09-10T08:47:46+5:302019-09-10T08:47:49+5:30
वादग्रस्त विधानानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न
रायपूर: राजकीय नेता होण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्ल्यामुळे छत्तीसगडचे उद्योग मंत्री कवासी लखमा वादात सापडले आहेत. नेता होण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकाची कॉलर धरा, असं वादग्रस्त विधान लखमा यांनी केलं. लखमा शिक्षक दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना काही दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितला. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सुकमा जिल्ह्यातील कोटा मतदारसंघाचे आमदार असलेले कवासी लखमा 5 सप्टेंबरला एका शाळेत कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी एका शाळेत घडलेला प्रसंग सांगितला. 'काही दिवसांपूर्वी मी एका शाळेत कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलो होतो. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि काँग्रेसचेछत्तीसगडचे प्रभारी पी. एल. पुनिया उपस्थित होते. त्यावेळी तिथे अनेक विद्यार्थी उपस्थित होते. त्यातल्या एका विद्यार्थ्याला तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय, असा प्रश्न मी विचारला. त्यावर मला भविष्यात नेता व्हायचंय, असं उत्तर त्यानं दिलं आणि त्यासाठी काय करावं लागतं, असा प्रश्नदेखील विचारला. पोलीस अधीक्षक किंवा जिल्हाधिकाऱ्याची कॉलर पकडशील, तर नेता होशील, असा सल्ला मी त्या विद्यार्थ्याला दिला. माझा हा सल्ला ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळेच जण हसू लागले,' असं लखमा यांनी शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितलं.
या प्रकरणी लखमा यांच्याशी संपर्क साधला असता, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचं म्हणत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 'मी अनेकदा शाळा, आश्रमशाळांना भेटी देतो आणि तिथल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षांबद्दल प्रश्न विचारतो. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी नेता होण्यासाठी काय करावं लागतं, असा प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला मी व्यवस्थित अभ्यास करायला हवा, लोकांच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरायला हवं. प्रचंड मेहनत करायला हवी, असं उत्तर दिलं. नेता होण्यासाठी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्याची कॉलर धरायला हवा, या विधानात तथ्य नाही,' अशी सारवासारव लखमा यांनी केली.