नाशिक : अन्नधान्य महामंडळाकडून मुदतीत धान्य न उचलल्याने शहरातील चाळीसहून अधिक रेशन दुकानदारांना डिसेेंबरचा दुसरा आठवडा उलटूनही नोव्हेंबर महिन्याचे धान्य मिळू शकलेले नाही. परिणामी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत व्यवस्था विस्कटली असून, त्यातून दुकानदार व शिधापत्रिकाधारकांमध्ये वाद होऊ लागले आहेत. गेल्या नऊ महिन्यांपासून अन्न धान्य महामंडळातून शासकीय धान्य गुदामापर्यंत अन्नधान्याची वाहतूक करण्यास ठेकेदाराने नकार दिल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. यासाठी शासनाकडून निविदा मागवून वाहतूक ठेकेदार निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु अवास्तव दर मागणीमुळे या निविदाही शासनाकडे विचाराधिन पडून आहे. अशा परिस्थितीत धान्याची वाहतूक कशी करावी असा प्रश्न पुरवठा विभागाला पडलेला असून, खासगी वाहनांच्या माध्यमातून दर महिन्याला धान्याची वाहतूक करताना दमछाक होत आहे. दर महिन्याला शासनाने निश्चित केलेले धान्य उचल करण्यास वाहतुकीचा अडसर ठरत असल्याने नोव्हेंबर महिन्याचे संपूर्ण धान्य पुरवठा विभाग उचलू शकलेले नाही, त्यातून शहरातील ४० दुकानांना नोव्हेंबर महिन्याचे अंत्योदय व अन्नपूर्णा योजनेचे धान्य मिळालेले नाही. डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडाही उलटला, परंतु शिधापत्रिकधारक धान्याची मागणी करीत असल्याने दुकानदारांमध्ये तू-तू मै-मै होऊ लागली आहे.
रेशन दुकानांना धान्याची प्रतीक्षा
By admin | Published: December 12, 2015 12:28 AM