नवी दिल्ली : भारतीय टपाल विभागात खातेबाह्य कर्मचारी म्हणून ग्रामीण व दुर्गम भागांत काम करणा-या ग्रामीण डाकसेवकांच्या सुधारित वेतनश्रेणी व भत्त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.देशभरातील तीन लाखांहून अधिक ग्रामीण डाकसेवकांना याचा लाभ होईल. यामुळे चालू आर्थिक वर्षात १,२५७ कोटींचा बोजा पडेल. यापैकी ८६० कोटी थकबाकी वगैरेसाठी एकदाच खर्च करावे लागतील तर आणखी ३६० कोटींचा दरवर्षी वाढीव खर्च होईल.पगाराची फेरचना करताना आता ग्रामीण डाक सेवकांची ‘ब्रँच पोस्ट मास्टर’ व ‘असिन्टंट ब्रँच पोस्ट मास्टरसह इतर’ अशी वर्गवारी केली गेली आहे. जे ब्रँच पोस्ट मास्टर दिवसाला किमान चार तास काम करतात, त्यांना १२ हजार तर दिवसाला पाच तास काम करणा-यास १४,५०० रुपये इतका पगार (टाइम रिलेटेड कन्टिन्युइटी अलाऊंस-टीआरसीए) मिळेल. असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर व अन्य डाकसेवकांसाठी ही वेतनश्रेणी अनुक्रमे १० हजार व १२ हजार रुपये असेल. तसेच यांना महागाईभत्ता स्वतंत्रपणे मिळेल. अन्य सरकारी कर्मचाºयांप्रमाणे त्यात वेळोवेळी वाढ होईल. तसेच सात हजार रुपये कमाल ‘टीआरसीए’ गृहित धरून वर्षातून एकदा सानुग्रह अनुदान दिले जाईल. वाढीव पगाराची १ जानेवारी २०१६ पासूनची थकबाकी एकरकमी दिली जाईल. यामुळे ग्रामीण सेवकांना ‘टीआरसीए’मध्ये वर्षाला तीन टक्के वाढ मिळेल. ती विनंतीनुसार दरवर्षी १ जानेवारी वा १ जुलैपासून मिळेल. याशिवाय जोखीम व खडतर कामाचा नवा भत्ताही सुरु करण्यात आला आहे. सध्या मिळणाºया अन्य भत्त्यांचे दरही वाढविले आहेत.१ लाख २९ आॅफिसेसग्रामीण व दुर्गम भागांत टपाल आणि वित्तीय सेवा पुरविणारी ब्रँच पोस्ट आॅफिसेस ही महत्त्वाची यंत्रणा आहे. पूर्णवेळ कर्मचारी ठेवून टपाल कार्यालये चालविणे अव्यवहार्य आहे, अशा ठिकाणी ही ब्रँच पोस्ट आॅफिसची व्यवस्था गेली १५० वर्षे कार्यरत आहे. देशभरात अशी १.२९ लाख ब्रँच पोस्ट आॅफिस असून, त्यात तीन लाखांहून अधिक खातेबाह्य कर्मचारी काम करतात. ते उपजीविकेच्या अन्य साधनांखेरीज हे काम अर्धवेळ करतात. यातून त्यांना पूरक उत्पन्न मिळते. या कर्मचाºयांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे असते.
ग्रामीण डाक सेवकांना भरघोस पगारवाढ मंजूर, तीन लाख कर्मचाऱ्यांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 12:11 AM